विजेच्या लपंडावामुळे सुधागडवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:29 AM2019-06-14T01:29:50+5:302019-06-14T01:30:05+5:30

पाली महावितरणवर मोर्चा : अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Because of the lightning flutter, Sudhagawara Haraan | विजेच्या लपंडावामुळे सुधागडवासी हैराण

विजेच्या लपंडावामुळे सुधागडवासी हैराण

Next

पाली : तालुक्यातील परळी, पेडली, रासळ, राबगाव, कानसळ, नाडसूर, जांभूळपाडा, सिद्धेश्वर, नांदगाव भागासह आदिवासी वाड्यावर गेली ७ ते८ दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी गुरुवारी पालीतील वीजवितरण कार्यालयालावर धडक देऊन घेराव घातला व अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. १५ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास रास्ता रोको करणार असल्याचा इशारा या वेळी नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच तालुक्यातील वीज ग्राहकांशी उद्धटपणे वागणाºया अधिकाºयांची बदली करण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे.

पाली बस स्थानकातून बाजारपेठ मार्गे पाली महावितरण कार्यालयावर निघालेल्या मोर्चात आरपीआय तालुकाध्यक्ष राहुल सोनावणे, सुरेश जाधव, सुधागड बौद्धजन पंचायत अध्यक्ष दीपक पवार, मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे, भगवान शिदे, ह.भ.प. महेश पोंगडे, हेमंत गायकवाड आदीसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी महावितरणचे सहायक उपअभियंत्यांना समस्यांचे निवेदन देण्यात आले. त्या वेळी त्यांच्यासमावेत पाली पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून सुधागड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी वीजवितरणच्या अखत्यारीत असलेली महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने जनतेला खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येथील वीजवाहिन्या जीर्ण तर खांब धोकादायक झाले आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यावसायिक तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात निघणारे सरपटणारे प्राणी, साप, विंचू व कीटक काळोखात दिसत नाहीत. तसेच डासांच्या उपद्रवाने नागरिकांचा जीव व आरोग्य धोक्यात आले आहे.

विजेच्या कडकडाटासह पाऊस आल्यास लाइट ट्रिप होते. दिवसा ऊन व पाऊस असे वातावरण असल्याने चीनमातीचे फिडर उन्हामुळे तापतात तर काही वेळानं त्यावर पाऊस पडल्यास हे फिडर तडकल्याने वीजपुरवठा खंडित होतो. सुधागडसाठी एकूण ६७ कर्मचारी संख्या मंजूर आहे सध्या केवळ ३५ कर्मचारी कार्यरत असल्याने कामाचा ताण वाढला आहे. तरीही लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करण्यात येईल.
- संतोष पालवे, सहायक उप अभियंता, पाली महावितरण

सुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. वीजपुरवठा खंडित झाला तर नागरिकांपुढे अनेक समस्या व अडचणी निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात व येणाºया सणासुदीत वीजपुरवठा कायम सुरळीत राहावा या दृष्टिकोनातून वीजवितरण विभागाने अधिक दक्षता घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
- रवींद्रनाथ ओव्हाळ,
सामाजिक कार्यकर्ते, पाली

Web Title: Because of the lightning flutter, Sudhagawara Haraan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.