जिल्ह्यातील पर्यटकांची परतीच्या प्रवासाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 03:44 AM2018-05-02T03:44:14+5:302018-05-02T03:44:14+5:30
सुट्ट्या संपल्यामुळे पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गेले तीन दिवस हाउसफुल झालेले रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे खाली झाले आहेत
अलिबाग : सुट्ट्या संपल्यामुळे पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गेले तीन दिवस हाउसफुल झालेले रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे खाली झाले आहेत. वीकेण्डला फूल टू धमाल करीत पर्यटकांनी मनमुरादपणे सुट्टीचा आनंद लुटला. सायंकाळनंतर पर्यटकांनी आपापले घर गाठायला सुरुवात केली. त्यामुळे अलिबाग-मुंबई, अलिबाग-पुणे या मार्गावर वाहनांची गर्दी दिसत होती.
शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग सुट्ट्या आल्याने अलिबाग, वरसोली, मांडवा, किहीम, आक्षी, नागाव, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर यासह अन्य समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. पर्यटकांचा सलग तीन दिवसांचा वावर असल्याने शहरातील रस्तेही चांगलेच गजबजून गेले होते.
मुंबई, पुण्यासह विशेषत: परदेशी पर्यटकांनीही या सुट्ट्यांमध्ये हजेरी लावल्याचे दिसून आले.
मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने येथील हॉटेल, रेस्टारंट, बार, लॉजिंग, रिसार्ट, कॉटेजेस फूल झाले
होते. पर्यटक समुद्रकिनाऱ्यांना पसंती देत असल्याने तेथील वॉटर स्पोर्ट्स, बनाना राइड, एटीव्ही राइड, घोडे सवारी, उंटाची सफर यासह अन्य मनोरंजनाची सेवा पुरवणाºया व्यावसायिकांच्या चेहºयावर हसू पसरल्याचे दिसले.
सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद मनमुरादपणे लुटल्यानंतर मंगळवार, १ मे राजी पर्यटकांनी सायंकाळी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गजबजून गेलेले समुद्रकिनारे ओस पडत असल्याचे दिसले. अलिबाग एसटी आगार, तसेच कॅटमरॅन सेवा पुरवणाºया कंपन्यांच्या कार्यालयाबाहेर पर्यटकांची गर्दी दिसली. काही पर्यटक हे स्वत:च्या वाहनाने आले होते. त्यांनीही दुपारनंतर अलिबागमधून माघारी जायला सुरुवात केली. त्यामुळे अलिबाग-पेण, पेण-पनवेल, पनवेल-मुंबई, पनवेल-ठाणे, त्याचप्रमाणे अलिबाग-पुणे या मार्गांवरही वाहनांची वर्दळ होती.