घरचेच उमेदवार असल्याने शिवतीर्थावर उमटणार घराणेशाहीचा ठसा
By admin | Published: February 16, 2017 02:12 AM2017-02-16T02:12:24+5:302017-02-16T02:12:24+5:30
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेल्या महिला उमेदवारांच्या
आविष्कार देसाई / अलिबाग
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेल्या महिला उमेदवारांच्या लढती या विशेष लक्षवेधी ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे, शिवसेनेकडून मानसी दळवी, तर शेकापकडून नीलिमा पाटील आणि सुश्रुता पाटील या प्रमुख दावेदार मानल्या जातात. शिवसेनावगळता शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसने घराणेशाहीचा ठसा शिवतीर्थावर उमटविण्यासाठी घरातीलच उमेदवार रणांगणावर उतरविले आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षाचा वारसा असाच पुढे सुरू राहणार की त्याला ब्रेक लागणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
रायगड जिल्हा परिषदेने शतकी अर्थसंकल्प सादर केल्याने राज्याच्या नजरा रायगड जिल्हा परिषदेकडे वळल्या होत्या. आर्थिकदृष्ट्या कमालीच्या सक्षम असलेल्या जिल्हा परिषदेवर आपलेच वर्चस्व राहावे, अशी महत्त्वाकांक्षा सर्वच राजकीय पक्षांची असू शकते. त्याच शिवतीर्थावरील सत्ता काबीज करण्यासाठी शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चुरस आहे.
जिल्ह्याच्या राजकारणातील समीकरणे बदललेली असल्याने कोणत्याही एका पक्षाला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोचता येणार नाही. याचसाठी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठिकठिकाणी जमेल तशी युती केली आहे, तीच परिस्थिती काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांची आहे. सातत्याने सत्तेचे वलय आपल्याच आसपास फिरत राहावे यासाठी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच प्रयत्नशील राहिली असल्याचे मागे वळून पाहिल्यावर दिसून येते. इतर पक्षही त्याला अपवाद नसावेत. सत्ता आपल्याच अमलाखाली असावी यासाठी जिल्ह्यात घराणेशाही सुरू असल्याचे चित्र आहे.
घराणेशाहीतून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सत्तेचा हव्यास असलेल्या शेकाप, राष्ट्रवादीने तिसरी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरवली आहे. ज्यांनी पक्षासाठी आपले आयुष्य घालवले त्यांच्या हाती मात्र पुन्हा झेंडेच आले असल्याचे दिसून येते. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सत्तेचा केंद्रबिंदू आपल्याकडे राहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांना रोहे तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडे त्या प्रवर्गातील सक्षम कार्यकर्ता उमेदवार म्हणून सापडला नसावा आणि त्यामुळेच अदिती यांना उमेदवारी मिळाली असे मानण्यावाचून कार्यकर्त्यांकडे पर्यायच नाही. शेकापने अलिबागचे आ. सुभाष पाटील यांच्या पत्नी सुश्रुता पाटील, पेणचे आ.धैर्यशील पाटील यांच्या पत्नी नीलिमा पाटील यांना अनुक्रमे अलिबागमधील शहापूर, पेणमधील पाबळ जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. या सर्व महिला उमेदवार अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जातात. दुसरीकडे शिवसेनेने अलिबाग तालुक्यातील थळ मतदार संघातून मानसी दळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्याही अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आहेत.