‘असंघटित कामगारांना शासकीय योजनांचा लाभ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:38 PM2018-10-21T23:38:34+5:302018-10-21T23:38:44+5:30
असंघटित नाका कामगारांना शासनाच्या सोयी-सुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत आहे.
खोपोली : असंघटित नाका कामगारांना शासनाच्या सोयी-सुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत आहे. त्यासाठी असंघटित कामगारांना प्रमाणपत्र देण्यात येते. या पार्श्वभूमीवर खोपोली पालिकेतर्फे शनिवारी अय्युब गुलाब खान या नाका कामगाराला प्रातिनिधिक स्वरूपात खोपोली पालिकेतर्फे मुख्याधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्याचा कार्यक्रम मुख्याधिकारी यांच्या कक्षात संपन्न झाला. यावेळी नगरसेविका जीनी सॅम्युअल, बांधकाम अधिकारी असिफ खान पठाण, शशिकांत दिघे उपस्थित होते.
विशेष म्हणजे बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार असंघटित असतात. अनेकदा त्यांना कुठल्याच सुविधा मिळत नसतात. अनेकदा अपघातात कामगार अपंग होतो अथवा त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे त्याचा संसार उघड्यावर पडतो.
असंघटित असल्याने त्याला दाद मिळत नसते. पण शासनाच्या नवीन योजनेमुळे त्याला मदतीचा हात मिळणार आहे. यासाठी
त्याला नोंदणी करणे गरजेचे आहे. यासाठी त्याचे १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असणे गरजेचे असल्याचे मुख्याधिकारी यांनी प्रसार माध्यमांंशी बोलताना सांगितले.
नगरपरिषदेत त्याबाबत नोंदणी केली जाते. ज्या ठेकेदाराकडे नाका कामगार काम करतात, त्याचे पत्रही अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले
जाते.
यावेळी नाका कामगारांनी मुख्याधिकारी संजय शिंदे,
नगरसेविका जीनी सॅम्युअल व अधिकारी वर्गाचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.