आमदार योगेश कदमांच्या अपघातामागे बंगाली बाबा? राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे वेगळंच ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 09:10 AM2023-01-08T09:10:52+5:302023-01-08T09:12:36+5:30

राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी केलेल्या विधानामुळे याप्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला आहे.

Bengali father behind MLA Yogesh Kadam's accident? A different twist due to the leader of NCP Sanjay Kadam | आमदार योगेश कदमांच्या अपघातामागे बंगाली बाबा? राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे वेगळंच ट्विस्ट

आमदार योगेश कदमांच्या अपघातामागे बंगाली बाबा? राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे वेगळंच ट्विस्ट

googlenewsNext

रायगड - शिंदे गटातील आमदार आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटामध्ये अपघात झाला आहे. योगेश कदम हे खेड येथून मुंबईकडे येत असताना त्यांच्या कारला डंपरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र, अपघातानंतर त्यांचे वडिल रामदास कदम यांनी ही घातपाताची शक्यता असल्याचे म्हटले. तर, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी बंगाली बाबाचा उल्लेख करत वेगळाच संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे, या अपघाताची चांगलीच चर्चा रंगली आहे. सुदैवाने योगेश कदम हे सुखरुप आहेत. 

राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी केलेल्या विधानामुळे याप्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला आहे. रामदास कदम यांच्याशी संबंधित एका बंगाली बाबानेच हा अपघात घडवून आणला असावा, अशी चर्चा दापोलीत सुरु असल्याचे वक्तव्य संजय कदम यांनी केले. त्यांच्या या थेअरीमुळे आता हा बंगाली बाबा नेमका कोण, किंवा त्याने असे काय केले असेल, यांसह विविध प्रश्नांची चर्चा होताना दिसून येते. या अपघातावर घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, खेडमध्ये आलेल्या बंगाली बाबांना त्यांचा शिधा मिळाला नाही. त्यामुळेच हे कारस्थान रचण्यात आलं का, असा सवाल संजय कदम यांनी थेट पत्रकार परिषदेतच विचारला आहे. त्यामुळे, या बंगाली बाबाची चर्चा आता रायगड जिल्ह्यात रंगली आहे. 

रामदास कदमांचा दाखलाही दिला 

बंगाली बाबा कोणाच्या गाडीतून फिरतो, हे डुप्लिकेट सेनेचे नेते सांगू शकतात. बंगाली बाबाला शिधा न मिळाल्यामुळे घाटात कोणी काय कोंबडी-कुत्रं पुरलं, हे ते सांगू शकतात. एकदा डुप्लिकेट सेनेच्या नेत्याच्या घरातील कुत्रा मेला. तेव्हा खासदार अनंत गीते यांच्यावर आरोप करण्यात आला. बंगाली बाबाने त्यांना सांगितलं होतं की, तुमच्या नारळाच्या बागेत लिंबं-कोंबडं कापलेले आहे. त्यानंतर डुप्लिकेट सेनेचे नेते नारळाच्या बागेत गेले तेव्हा त्यांना तिथे लिंबू आणि कापलेले कोंबडे सापडले. नंतर याच बंगाली बाबाने एका भक्ताला सांगितले की, शिधा मिळवण्यासाठी आम्हीच त्याठिकाणी लिंबू आणि कोंबडं टाकलं. योगेश कदम यांच्या आताच्या अपघातापाठीही हेच कारण असावे, अशी चर्चा असल्याचे संजय कदम यांनी म्हटले.

दरम्यान, योगेश कदम हे शिंदे गटातील आमदार असून ते शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी आले होते. तिथे काही कार्यकर्त्यांचा त्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. त्यानंतर ते मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी त्यांची कार कशेडी घाटात आली असताना त्यांच्या कारला डंपरने घडक दिली. त्यामुळे योगेश कदम यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली. तर त्यांच्या कारचा ड्रायव्हर आणि सुरक्षेतील पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.

काय म्हणाले रामदास कदम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री टँकरने ठोकर देऊन झालेला अपघात हा घातपाताचा प्रयत्न होता, असा संशय बाळासाहेबांची शिवसेना नेते रामदास कदम यांनी शनिवारी खेड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. रामदास कदम म्हणाले की, रायगडचे जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे घटनेच्या सखोल चौकशीची मागणी आपण केली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीच्या पुढे व पाठीमागे पोलिसांचे वाहन असतानाही टँकरने पोलीस गाडीला ओव्हरटेक करून आमदारांच्या गाडीला पाठीमागून ठोकरले कसे? हा प्रकार संशयास्पद वाटतो. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या माध्यमातून योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु दापोली मतदार संघातील जनता आमदार कदम यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिली. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे हा अपघात म्हणजे त्यांना संपवण्याचा कट तर नाही ना असा माझ्या मनामध्ये संशय आहे. 
 

Web Title: Bengali father behind MLA Yogesh Kadam's accident? A different twist due to the leader of NCP Sanjay Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.