- जयंत धुळपअलिबाग- रायगड जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने शनिवारी येथील जिल्हा न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत या उपक्रमाचे आयोजित करण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला आहे. तब्ब्ल 6 हजार 440 प्रकरणे एका दिवसांत तडजोडीने तसेच वादपूर्व निकाली निघू शकली असून, या सर्व प्रकरणांची रक्कम 14 कोटी 44 लाख 32 हजार 560 रुपये आहे. जिल्ह्यातील या लोकअदालतीमधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याच्या दृष्टीने 33 कक्षांची व्यवस्था करण्यात आली होती.अलिबाग येथील लोकअदालतीसाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मु. गो. सेवलीकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव एल. डी. हुली, न्यायिक अधिकारी, वकील आदी उपस्थित होते. लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये 4 हजार 143 प्रकरणो तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 836 प्रकरणो निकाली काढण्यात आली व त्यामध्ये 7 कोटी 15 लाख 41 हजार 495 इतकी रक्कम भरण्याचे मान्य करण्यात आले.वादपूर्व प्रकरणे 20 हजार 920 तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती, त्यापैकी 5 हजार 604 प्रकरणे निकाली निघाली व त्यामध्ये रक्कम 7 कोटी 28 लाख 91 हजार 065 इतकी रक्कम देण्यात आली असल्याची माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव एल. डी. हुली यांनी दिली आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीस उत्तम प्रतिसाद : प्रकरणे निर्गतीसाठी तब्बल 33 कक्षांची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 8:09 PM