मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यात अतिवृष्टीमुळे बागायत जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. ३५५ हेक्टर परिक्षेत्रात सुपारीच्या झाडांची मोठी लागवड केली जाते. मुरुड तालुक्यात नांदगाव, आगरदांडा, मुरुड शहर, आंबोली, माजगाव, सर्वे, काशीद, बोर्ली, भोईघर आदी ठिकाणी सुपारीची मोठी लागवड केली जाते. सुपारीचे उत्पादन वर्षातून एकदाच घेता येते; परंतु यंदा मुरुड तालुक्यात ४२२४ पेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्याने सुपारी उत्पादनाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.अतिवृष्टीमुळे सुपारीच्या झाडाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. त्याचप्रमाणे बुरशीची लागण झाल्याने यंदाच्या सुपारी उत्पादानात घट होणार आहे.मुरुड तालुक्यातील बागायत जमिनी फार मोठ्या प्रमाणात असून प्रत्येकाच्या एक एकरपेक्षा जास्त सुपारी व नारळाच्या मोठ्या बागायत जमिनी आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही भारतातील सुपारीला विशेष दर्जा असून चांगली मागणी आहे.यंदा सर्वाधिक पाऊस पडल्याने सुपारीचे उत्पादन कमी प्रमाणात येणार असल्याचे असंख्य बागायतदारांनी सांगितले. जास्त पाऊस हा सुपारीला अनुकूल नसतो. मध्यम स्वरूपाच्या पावसाची गरज योग्य मानली जाते. एकट्या मुरुड तालुक्यात सुपारी उत्पादनाची साडेतीन कोटीची उलाढाल आहे.मुरुड तालुका सहकारी सुपारी खरेदी-विक्री संघामुळे सर्व सदस्यांना चांगला भाव मिळवून देण्याचे उत्तम काम या संस्थेद्वारे केले जाते; परंतु यंदा पावसाचे प्रमाण खूप वाढल्याने सुपारीला मोठी बाधा निर्माण झाली आहे.कोकणातील महत्त्वाच्या अशा सर्वच ठिकाणी अतिवृष्टीही झाल्याने मोठा धोका निर्माण होऊन सुपारी उत्पादनाचे प्रमाण कमी होणार आहे. काही ठिकाणी बुरशी तर काही ठिकाणी सुपारी गळून पडली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून वर्षभरातून येणारे उत्पादन वाया गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडला आहे. निसर्गाने अवकृपा केल्याने या अस्मानी संकटाला तोंड कसे द्यावे हा मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.मुरुड तालुक्यातील सुपारीच्या उत्पादनासाठी वर्षभरात खूप मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी शेणखत व असणारी विविध फवारणीसुद्धा करावी लागते. त्यानंतर झाडाची पूर्णवाढ झाल्यावर गर्द पिवळी अशी सुपारीची फळे तयार होतात; परंतु यंदा पावसामुळे काही शेतकऱ्यांनी फवारणी केली होती.पाऊस पडल्याने सर्व असणारे औषध वाया गेले आहे. बुरशीजन्य रोग झाल्याने झाडावरची सर्व सुपारी गळून जात असून सध्या झाडावर कोणतेही फळ दिसत नाही. शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.सुपारीच्या उत्पादनाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. काही ठिकाणी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सुपारीच्या लागवडीसाठी मोठा खर्च होतो, परंतु उत्पादन कमी आल्याने झालेला खर्चसुद्धा सुटणार नाही. त्यामुळे शासनाने सुपारी बागायतदारांना नुकसानभरपाई द्यावी.- सचिन पाटील,बागायतदार, नांदगाव
मुरुडमध्ये अतिवृष्टीमुळे सुपारी उत्पादनाला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 2:37 AM