दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र : ५ कोटी ६४ लाख रुपये निधी मंजूर
By निखिल म्हात्रे | Published: November 18, 2023 04:34 PM2023-11-18T16:34:26+5:302023-11-18T16:34:57+5:30
सुपारी केंद्राचे विस्तारीकरण झाल्यानंतर स्थानिक शेतकरी व बागायतदारांना उत्पन्न वाढीबरोबरच उद्योगासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळणार आहे.
अलिबाग - रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत असणाऱ्या सुपारी संशोधन केंद्राचे विस्तारित केंद्र दिवेआगर येथे उभारण्यात येणार आहे. २ हेक्टर जागेवर उभारण्यात येणाऱ्या विस्तारित केंद्रासाठी ५ कोटी ६४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सुपारी केंद्राचे विस्तारीकरण झाल्यानंतर स्थानिक शेतकरी व बागायतदारांना उत्पन्न वाढीबरोबरच उद्योगासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळणार आहे. दिवेआगरच्या पर्यटन व्यवसायालाही यामुळे चालना मिळणार आहे.
रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी भागात सुपारी हे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या पिकासोबत नारळ, केळी, पपनस, जाम तसेच जायफळसारखी मसाला पिके घेतली जातात. यामुळे कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत असणाऱ्या सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन येथे १९६५ मध्ये सुरू करण्यात आले. तेव्हापासून कोकणातील सुपारी बागायतदारांसाठी या केंद्रात संशोधन केले जाते. या केंद्रात झालेल्या संशोधनानंतर कोकणातील श्रीवर्धनी ही भरपूर उत्पन्न देणारी सुपारीची जात विकसित करण्यात आली. तसेच त्या सुपारीच्या जातीच्या रोपांची निर्मिती करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ती पोहोचविण्यात आली. श्रीवर्धनी सुपारीच्या जातीचे भौगोलिक मानांकन घ्यावयाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
श्रीवर्धन येथे असणाऱ्या सुपारी संशोधन केंद्राचे विस्तारित संशोधन केंद्र दिवेआगर येथे उभारण्यात येणार आहे. या केंद्रासाठी २ हेक्टर जमीनीवर ५ कोटी ६४ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या विस्तारित संशोधन केंद्रात सुपारी पिकावरील संशोधनास चालना मिळेल. सुपारीच्या बुटक्या, तसेच, दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या बरोबरच दिवेआगार, श्रीवर्धन परिसराचे हवामान आणि जमीन विचारात घेवून अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळवून देणाऱ्या पिकाची आंतर पीक पध्दती विकसीत करण्यासाठी संशोधन कार्य केले जाणार आहे.