सामन्यांच्या बहाण्याने काढलेली सहल मुलांच्या जिवावर बेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 06:56 AM2018-05-27T06:56:51+5:302018-05-27T06:56:51+5:30
अलिबाग येथे सहलीसाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. त्यापैकी दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून एकाचा अद्याप शोध लागलेला नाही.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - अलिबाग येथे सहलीसाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. त्यापैकी दोघांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून एकाचा अद्याप शोध लागलेला नाही. दरम्यान, रात्री समुद्रात पोहण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न त्यांच्या जिवावर बेतला आहे.
कोपरखैरणे परिसरातील २० ते २५ वयोगटातली सुमारे १२ मुले अलिबाग येथे सहलीसाठी गेली होती. त्यापैकी दोघांचा नागाव बीचवर समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. आशिष मिश्रा (२४), सुहाद (फद्दु) सिद्दिकी (२१) अशी समुद्रात बुडालेल्यांची नावे असून, मिश्रा व सिद्दिकी यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून, चैतन्य सुळे याचा पोलीस शोध घेत आहेत. आशिष कोपर खैरणे सेक्टर २चा, सुहाद सेक्टर १९ व चैतन्य सेक्टर १४चा राहणारा आहे. सहलीला त्यांच्यासोबत मोहित पुजारी, प्रतीक शेट्टी, अजिंक्य पाटील, प्रज्योत पिंजारी आदींसह कोपरखैरणे परिसरातील इतरही मुले होती. त्यापैकी काही जण फुटबॉल खेळाडू आहेत. सरावाच्या निमित्ताने ते नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अलिबाग येथे सहलीचा बेत आखला. यासाठी काहींनी फुटबॉलचे सामने असल्याचे घरच्यांना सांगितले होते. शिवाय त्यांनी त्यांचा जुना कोच प्रतीक शेट्टी याला सामन्याला जायचे असल्याचे सांगून बेंगलोरवरून बोलावून घेतले होते. त्यानेदेखील रात्रीच्या वेळी समुद्राच्या पाण्यात उतरण्यास सर्वांना विरोध केला. परंतु फक्त ५ मिनिटे आनंद घेतो असे सांगून विरोध डावलून चौघे जण समुद्राच्या पाण्यात उतरले. या वेळी भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाले तर एक जण सुखरूप बाहेर आला. छातीपेक्षा जास्त खोलीच्या पाण्यात ते उभे असताना पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांना सावरता आले नाही. यामुळे ते लाटेसोबत वाहत गेल्याचा प्रत्यक्षदर्शींचा अंदाज
आहे.
शनिवारी पहाटेपर्यंत या घटनेची माहिती सहलीला गेलेल्या प्रत्येक मुलाच्या घरापर्यंत पोहोचली होती.
रात्री पोहण्याचा मोह ठरला अखेरचा
नागांव येथे आलेल्या या सहलीतील मुलांना त्यांचे कोच प्रतीक शेट्टी यांनी रात्रीच्या वेळी समुद्रात उतरण्यास मनाई केली होती. परंतू ५ मिनिटे आनंद घेत असे सांगून चौघेजण पाण्यामध्ये उतरले. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने लाटेसोबत तिघे वाहत गेले.