महाड तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त
By admin | Published: February 23, 2017 06:17 AM2017-02-23T06:17:38+5:302017-02-23T06:17:38+5:30
जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी मंगळवारी पार पडलेल्या
महाड : जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदानानंतर गुरुवारच्या मतमोजणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाड तालुक्यात चौरंगी लढती झाल्या आहेत.
निवडणुकीच्या निकालानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीवायएसपी प्रांजली सोनावणे-पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त मतमोजणी केंद्राच्या परिसरात ठेवण्यात आलेला आहे.
गुरुवारी सकाळी १० वा. पासून शिवाजी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीसाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असून मतमोजणी अधिकारी, मतदान मोजणी प्रतिनिधी तसेच पत्रकारांशिवाय अन्य कोणासाठी मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी स्पष्ट केले.
गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेला पंचायत समितीमध्ये प्रत्येकी पाच असे समसमान जागांवर यश मिळालेले होते. तर जिल्हा परिषदेच्या पाचपैकी चार जागा यंदा शिवसेनेने तर केवळ एका जागेवर काँग्रेसला यश मिळाले होते. मात्र यंदा शिवसेना, काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चौरंगी लढतीमुळे या निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना आ. भरत गोगावले व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आ. माणिक जगताप यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली असून कोणत्या पक्षाला विजयाचा कौल देणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)