पनवेल : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यात १७ मतदारसंघांत मतदान होत आहे. ३३-मावळ लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या पनवेल विधानसभा क्षेत्रात मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. येथील मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मतदारसंघात दहा संवेदनशील मतदान केंद्रे असल्याने या केंद्रावर विशेष बंदोबस्तही या वेळी ठेवण्यात आला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ असलेला पनवेल हा मतदारसंघ आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ पनवेल हा आहे. एकूण पाच लाख ३९ हजार १८७ मतदार संख्या आहे. या याव्यतिरिक्त १७० सर्व्हिस वोटर्स (मतदार) या विधानसभा क्षेत्रात आहेत. मूळ मतदान केंद्र ५६३ आणि सहायक मतदान केंद्र २१ असे मिळून एकूण ५८४ मतदान केंद्रआहेत.
पनवेलमध्ये एकूण ८२२ मतदार दिव्यांग असून, दिव्यांगांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी घरापासून मतदान केंद्रापर्यंत नेण्या-आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ५८४ मतदान केंद्रावर प्रत्येकी पाच याप्रमाणे २९२० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. याशिवाय दहा टक्के राखीव कर्मचारी व आठ भरारी पथकांची नजर असणार आहे. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी ११८ बस व ३० मिनीबसची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रि या संपल्यानंतर पुणे येथील बालेवाडी येथे मतपेटी नेण्यात येणार आहेत. रविवारी पनवेलमधील व्ही. के. हायस्कूलमध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्यामार्फत मतदान केंद्रावरील कर्मचाºयांना ट्रेनिंग देण्यात आले. निवडणुकीचे कामकाज, मशिनची हाताळणी या संदर्भातही ट्रेनिंग पार पडले.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रसायनीत पोलिसांचे पथसंचलनमावळ लोकसभा मतदारसंघात सोमवार, २९ एप्रिल रोजी होणारे मतदान शांततेत पार पडावे आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खालापूर तालुक्याचे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरु ण भोर यांच्या नेतृत्वाखाली एकूण १६० पोलीस कर्मचाऱ्यांनी चांभार्ली, मोहोपाडा बाजारपेठेतून वावेघर असे पथसंचलन केले.
मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांना निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी वातावरण उत्साही करण्यासाठी पोलिसांकडून चांभार्ली ते नवीन पोसरी-मोहोपाडा बाजारपेठेतून वावेघर असे पथसंचलन करण्यात आले. या वेळी पथसंचलनात एक डीवायएसपी, एक एपीआय, दोन पीआय, चार पीएसआय, ६० पोलीस कर्मचारी, ३० होमगार्ड, ३० सीआयएसएफ, ३० आरसीबी जवान सहभागी झाले होते. यासाठी रसायनीत चार सेक्टर नेमण्यात आले असून, पोलीस कर्मचारी संपूर्ण सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत राहणार आहेत. सशस्त्र असे हे संचलन पाहून रसायनीतील मतदार मतदानाच्या दिवशी जास्त संख्येने मतदान करण्यासाठी बाहेर पडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. पोलीस दल मतदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असल्याचे पोलीस सांगत आहेत.