पेण : भाल व विठ्ठलवाडी या गावांना गेल्या पावसाळ्यात पाणीपुरवठा ठप्प झाला. याबाबत पेण ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयाला अनेकदा पत्रव्यवहार व अधिकाऱ्यांच्या भेटी घेवून देखील कार्यवाही न केल्याने संतप्त ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयात येवून अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा वितरण सुरळीत करण्याबाबत जाब विचारला. मात्र ग्रामपंचायत शिष्टमंडळ कार्यालयात आले तेव्हा जबाबदार अधिकारीच गैरहजर राहिल्याने सदस्यांसह सरपंच नलिनी म्हात्रे व उपसरपंच रमाकांत म्हात्रे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.पेणच्या विठ्ठलवाडी व मोठे भाल गावाची पिण्याच्या पाण्यासाठी दयनीय अवस्था आहे. पावसाळ्यातील चार महिन्यात पाऊस पडल्याने पावसाच्या पाण्यावर ग्रामस्थांनी तहान भागविली. आता पाऊस गेल्यानंतर पिण्याचे पाणी कुठून आणणार? यासाठी वढाव ग्रुप ग्रामपंचायत सदस्यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार करुन देखील ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी डी.एन. खैरे व शाखा अभियंता मुसळे यांनी या गावांच्या पाणीपुरवठा वितरण करणाऱ्या जलवाहिन्यांकडे लक्ष दिले नसल्याची तक्रार शिष्टमंडळाने केली आहे. काही दिवस पाणीपुरवठा न झाल्यास पुन्हा एकदा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.एप्रिलमध्ये ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यावेळी शासकीय प्रांत अधिकारी निधी चौधरी, तहसीलदार सुकेशिनी पठारे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिले होते. उपोषण मागे घेतल्यानंतर टँकर पाणीपुरवठा समाप्तीनंतर जून ते सप्टेंबर या महिन्यात पाणीपुरवठा झालाच नाही.
भाल, विठ्ठलवाडी पाणीपुरवठा ठप्प
By admin | Published: October 05, 2015 11:56 PM