भरत गोगावलेंनी राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2016 01:32 AM2016-03-30T01:32:49+5:302016-03-30T01:32:49+5:30
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले, त्याच सत्याग्रह दिनाच्या वर्धापन दिनादरम्यान शिवसेना आमदार
महाड : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले, त्याच सत्याग्रह दिनाच्या वर्धापन दिनादरम्यान शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी तळ्याचे ब्राम्हणाकडून पूजन करून घेतले. हे कृत्य म्हणजे डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाला मूठमाती देणारे असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी केला. तमाम आंबेडकरी जनतेचा अपमान करणाऱ्या कृत्यात सहभागी झालेल्या महाडचे शिवसेना आ. भरत गोगावले यांनी आपल्या आमदारकीचा त्वरित राजीनामा द्यावा, तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी एकमुखी मागणी महाडच्या चवदार तळ्यावर आंबेडकरी जनतेच्या निषेध सभेत मंगळवारी करण्यात आली.
जलसंपदा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जलजागृती सप्ताहानिमित्त चवदार तळ्याचे ब्राम्हणाकडून जलपूजन करण्यात आले होते. या घटनेच्या निषेधार्थ महाड तालुक्यातील सर्व आंबेडकरी संघटनांतर्फे मंगळवारी भव्य निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट), भारतीय रिपब्लिकन पक्ष, बौध्दजन पंचायत समिती, भारतीय बौध्द महासभा, पीपल्स रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन सेना, डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती या संघटनेचे नेते, पदाधिकारी तसेच महाड तालुक्यातील सुमारे दीड हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. सिध्दार्थ कासारे यांनी आ. भरत गोगावले यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. आ. गोगावले यांना जलपूजाच करायची होती मग ती सावित्री किंवा गांधारी नदीच्या पाण्याची का केली नाही, असा प्रश्न करीत या जलपूजनासाठी सत्याग्रह दिनाचाच मुहूर्त का निवडला गेला असे सांगून डॉ. बाबासाहेबांच्या अस्मितेचा, तसेच त्यांच्या विचारांचा हा अपमान असल्याची टीकाही केली.
यावेळी ठाण्याचे दलित नेते सुनील खांबे, भारिप बहुजन महासंघाचे नेते तुळशीराम जाधव, रिपाइं उपाध्यक्ष केशव हाटे, भारिप नेते सज्जन पवार, विश्वनाथ सोनावणे,लक्ष्मण जाधव आदींनी या जलपूजनाचा तीव्र निषेध केला. या सभेला मुंबई, ठाणे येथील दलित नेतेही उपस्थित होते. (वार्ताहर)
तळ्याचे पाणी प्राशन करून निषेध
ज्या ठिकाणी आ. गोगावले यांच्या उपस्थितीत जलपूजन झाले, त्या ठिकाणी सर्व नेते व कार्यकर्त्यांनी तळ्याचे पाणी प्राशन करून या घटनेचा निषेध केला. या सभेच्या वेळी जयभीम व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने चवदार तळे परिसर दुमदुमून गेला होता. सभेनंतर सर्व नेत्यांनी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांना निवेदन देऊन जलपूजनाच्या नावाखाली तळ्याचे जलशुध्दीकरण करून घेणाऱ्यांवर जातीयवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.