भारिप बहुजन महासंघाचा घंटानाद, कर्जत तहसीलसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:42 AM2018-04-04T06:42:35+5:302018-04-04T06:42:35+5:30
शासनाला झोपेतून जागे करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार मंगळवारी तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
कर्जत - शासनाला झोपेतून जागे करण्यासाठी भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार मंगळवारी तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
तहसील कार्यालयाच्या बाहेर भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दीपक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. रिलायन्स व एचपीसीएल पाइपलाइनसंदर्भात अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा, चांदई येथील तासगावकर कॉलेजमध्ये सुरू असलेला संप व आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, दहिवली येथील एचपी पेट्रोल पंपावरील कामगारांवर होणारा अन्याय दूर करावा या मागण्या करत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर केले.
अलिबागमध्ये तहसिलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारीप बहुजन महासंघ रायगडचे जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले. निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांना निवेदन स्वीकारले.
सुधागड तालुक्यात तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन
राबगाव/पाली : सुधागड तहसीलदार कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघाकडून विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. कोरेगाव-भीमा हल्ल्याचे मुख्य सूत्रधारसंभाजी भिडे यांना त्वरित अटक करावी, या दंगलीत बहुजन बांधवांवरील नोंदवण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत. तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना १00 टक्के शिष्यवृती द्यावी, थकीत शिष्यवृती तत्काळ अदा करावी, शेतकºयांचा सात बारा कोरा करावा, आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा, वाकण-पाली-खोपोली रस्ताबाधित शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्यांसाठी सुधागडमधील भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्त शेतकºयांना योग्य न्याय मिळावा
पनवेल : भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन पनवेलमधील समविचारी सामाजिक संघटना संस्था यांच्या वतीने पनवेल तहसील कार्यालयावर महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बी.टी. गोसावी यांना देण्यात आले. यावेळी रसायनी, पनवेलमधील ८ गावांच्या प्रकल्पग्रस्त शेतकºयांना योग्य न्याय मिळावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भाजपा सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.