माणगाव :गुलाबी थंडीच्या मोसमात अनेक पक्षी युरोप, रशिया खंडातून तसेच टर्की आणि इराणसारख्या देशातून हजारो किलोमीटर स्थलांतरित होत असतात. पक्षीप्रेमींच्या कुतूहलाचा निरीक्षणाचा हा कालावधी. अशाच काही स्थलांतरित काळ्या डोक्याच्या भारीट पक्ष्यांचे अर्थात परदेशी पाहुण्यांचे थवेच्या थवे पहिल्यांदाच माणगाव तालुक्यात अवतरले आहेत. वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार शंतनू कुवेसकर यांना ते तालुक्यातील भातशेतीचे परिसरात आढळून आले आहेत.मुख्यत्वे शेतीच्या प्रदेशातच आढळणारे त्यांचे छोटछोटे तसेच अगदी शेकडोंच्या संख्येने असलेले थवे दरवर्षी हिवाळ्यात पाहायला मिळतात; परंतु एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात हजारो-लाखोंच्या संख्येमध्ये त्यांचे दिसून येणे हा फार दुर्मीळ योग आहे.काळ्या डोक्याचा भारीट हा पक्षी चिमणीसारखा सडपातळ दिसतो, याची शेपटी लांब आणि दुभागलेली असते. नरांचा रंग पोटाकडून गव्हाळी सोनेरी पिवळा तर पाठीकडे लाल-भुरा असतो, नरांच्याच डोक्यावर काळी टोपी असते. मादी नरांसारख्या आकाराच्याच; पण फिकट गव्हाळी रंगाच्या असतात. हे पक्षी थव्याने गवताळ व शेतीच्या प्रदेशात आढळतात.जमिनीवरील विविध प्रकारचे धान्य व गवताची बीजे खातात. दरवर्षी हे पक्षी पश्चिम आणि मध्य भारतात राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तसेच कर्नाटक या भागांत स्थलांतरित हिवाळी पाहुणे असतात. या पक्ष्यांचा आकाशातील विहंगम विहार बघून डोळ्यांचे पारणे फिटते. माणगाव तालुक्यात इको टूरिझम अर्थात पर्यावरणपूरक पर्यटनाचे दृष्टिकोनातून ही आनंदाची बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
माणगावमध्ये दाखल झाले भारीट पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 11:17 PM