निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: यावर्षी बळीराजा आनंदून गेला आहे. भात पिकाचा चांगला उतारा मिळेल, परिवार, लेकीबाळी सुखी होतील, अशी आस त्याला लागली असून, शिवारात तो भातलावणीची कामे करताना आपला आनंदात तो गुणगुणत आहे.
‘ये रे ये रे माझ्या पाण्या, माझे पोटाची भूक भागाया, लेक जावाय लं पाहण्या आणाया!’ या भलरीतून तो आपला आनंद व्यक्त करीत आहे.भातलावणी करताना आदिवासी भागात पारंपरिक लोकगीते गायची परंपरा आहे. याला भलरी असेही म्हणतात. कामे करताना ही गीते त्यांना एकप्रकारे स्फूर्ती व ऊर्जाही देत असते.
सध्या रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी लोकगीतांचे मधुर सूर कानी पडत आहे. यातून घर, कुटुंब आणि लेकराबाळांवरील प्रेम ते व्यक्त करत असतात. माहेराबद्दलचे प्रेम आणि आप्त स्वकीयांबद्दलचा जिव्हाळा अशा अनेक लोकगीतांमधून ते व्यक्त करतात. तरुणवर्गही सध्या भातलावणीत व्यस्त दिसत आहे. मात्र ते पारंपरिक लोक गीतांऐवजी डीजेची गाणी म्हणत काम करीत आहेत.आदिवासी परंपरा
लावणी संपणे हा शेतकरी व मजूरवर्गासाठी आनंदाचा सण असतो. जिथे अन्नाचा बेत उत्तम तिथे मजूर धाव घेत असतात. मात्र, परंपरा न विसरता कथा, चुटकुले व लोकगीतांचे सादरीकरण करण्याची प्रथा ग्रामीण भागात कायम असल्याचे दिसते.शेतकरी व मजुरांच्या घरी अगदी पहाटेपासून उठून घरकामाची आवरासावर करण्यासोबतच स्वयंपाक करणे, दुपारची व्यवस्था करत डबा भरणे अशी कसरत महिला मजुरांना करावी लागते. पावसापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकची खोळ सोबत न्यावी लागते. - अनिता चवरकर, शेतकरीगेली अनेक वर्षे आम्ही भातलावणी करीत आहोत. भातलावणीला बदली पद्धत असते. एकमेकास साहाय्य करू या उक्तीप्रमाणे आम्ही शेत लावणीला एकत्रित येऊन भर पावसात पारंपरिक लोकगीते गात काम करत असतो. - नंदकिशोर म्हात्रे, शेतकरी