भाताला १,४६० रुपये हमीभाव
By admin | Published: October 10, 2015 11:54 PM2015-10-10T23:54:29+5:302015-10-10T23:54:29+5:30
खरीप हंगामातील उत्पादित कृषी मालाच्या किमती केंद्र शासनाने जाहीर केल्या असून, ए ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,४५० रुपये तर सर्वसाधारण ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,४१० रुपये
पेण : खरीप हंगामातील उत्पादित कृषी मालाच्या किमती केंद्र शासनाने जाहीर केल्या असून, ए ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,४५० रुपये तर सर्वसाधारण ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,४१० रुपये सुधारित आधारभूत किंमत २०१५-१६ या वर्षासाठी जाहीर केल्या आहेत. गतवर्षीच्या आधारभूत किमतीमध्ये ५० रुपये वाढ केली आहे. या वर्षीचा खरीप हंगाम रायगडात समाधानकारक नसून, उत्तर दक्षिण रायगडात शेतीचे चित्र समाधानकारक आहे. सध्या आघाडीची परिपक्व झालेली पिकांची कापणी व झोडणी सुरू असून, परतीचा बेभरवशाचा पावसामुळे कापणी व मळणी एकाच वेळी उरकण्यावर शेतकरी बांधवांचा भर आहे.
नवरात्रोत्सवाची घटस्थापना होताक्षणी कापणीचा हंगाम भात शिवारात जोर धरू लागेल. गतवर्षी खरिपात उत्पादित झालेल्या भात हमी खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांना कमी भावात दालालांना विकावा लागला. गतवर्षी ए ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,३६० रुपये आधारभूत हमीभाव शासनाने जाहीर केला होता. मात्र भातखरेदी केंद्रच सुरू न केल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. १,००० ते ११,००० रुपये प्रतिक्विंटलने शेतकऱ्यांनी दलालांना भात विकला. वर्षभर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना या पद्धतीने नुकसान होऊनदेखील रायगड व कोकणपट्ट्यातील शेतकरी आपल्या पायावर सक्षमपणे उभा आहे.
यावर्षी आधारभूत किमतीमध्ये ५० रुपयांची भर टाकून १,४५० रुपये आधारभूत किंमत जाहीर झालेली असताना शेतकरी यावर समाधानी नाही. बियाणे, खते, मजुरी, किटकनाशके यांच्या वाढलेल्या किमती व उत्पादित होणाऱ्या शेतमालाला उत्पादनावर आधारित आधारभूत किंमत मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी फेडरेशनला कृषी व पणन मंडळाने लवकरात लवकर आदेश पारित करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना आपला कृषी उत्पादित माल या खरेदी केंद्रावर नेता येईल. राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबतीत अधिक लक्ष द्यावे, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. (वार्ताहर)