लोकमत न्यूज नेटवर्क, महाड: २० मार्च रोजी ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह दिन गेल्या अनेक वर्षांपासून साजरा करण्यात येत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भीमसैनिक या ठिकाणी दाखल महामानवाला अभिवादन करण्यासाठी येतात. या दिनाचे औचित्य साधून यावर्षी १९ मार्च रोजी शिवराय ते भीमराय अशी समता रॅली काढण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ ते २० मार्च १९२७ रोजी चवदार तळे येथे सामाजिक क्रांती केली. देशातील तमाम दलित, शोषित, पीडित आणि तळागाळातील घटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा सार्वजनिक पाणवठ्यावर मिळावी याकरिता चवदार तळे येथे सत्याग्रह केला.
अनुयायींसाठी व्यवस्था
याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या सभा होणार आहेत. याकरिता महाड नगर प्रशासन, महसूल विभाग, पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भीमसैनिकांना पिण्याचे पाणी, उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी मंडप, भोजनव्यवस्था, विविध संस्थांकडून करण्यात आली आहे, यावर्षी लोकसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्याने मंत्री किंवा राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार नाहीत. मात्र, लाखोंच्या संख्येने भीमसैनिक महामानवाला अभिवादन करण्यासाठी १९ मार्चपासूनच दाखल होण्यास सुरुवात झाली होती.