म्हाडातील मोठे ‘मासे’ मोकाटच !
By admin | Published: July 14, 2014 02:36 AM2014-07-14T02:36:09+5:302014-07-14T02:36:09+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एका आठवड्यात सलग तिघा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने म्हाडाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे
जमीर काझी, मुंबई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एका आठवड्यात सलग तिघा भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने म्हाडाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र ही कारवाई केवळ क्लार्क, शिपायापुरती सीमित न ठेवता गैरकारभाराचे मूळ असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. योजनेच्या मंजुरीच्या स्वाक्षरीस लाखोंची कमाई करणाऱ्या कार्यालयातील तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरील मोठे ‘मासे’ पकडल्यास म्हाडातील भ्रष्टाचाराला लगाम बसेल, अशी मागणी नारिकांतून होत आहे.
गरजू नागरिकांना रास्त दरात हक्काचा निवारा मिळवून देणे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) गेल्या काही वर्षांपासून भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. प्राधिकरणातील गैरव्यवहार व बेकायदेशीर कृत्याला प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्रपणे दक्षता विभागाची स्थापना केली असली, तरी त्याचे अस्तित्व केवळ कागदावरच राहिले आहे.
गेल्या आठवड्यामध्ये मिळकत विभागातील रामकृष्ण आत्राम याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर गुरुवारी पणन विभागातील वरिष्ठ लिपिक रिद्धी सावंत व जप्तीदार आनंद गवळी यांनी एका गिरणी कामगाराकडे लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने अटक करण्यात आली. आता हा कारवाईचा दंडुका रोज लाखोंची कमाई करणाऱ्या उपअभियंता, कार्यकारी अभियंता आणि त्यावरच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही चालवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.