मोठी बातमी: एसटी बस एकमेकांवर आदळून भीषण अपघात; १८ ते २० प्रवासी जखमी, २ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 10:48 AM2024-07-07T10:48:46+5:302024-07-07T10:49:29+5:30
जखमींना तत्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत.
राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग :अलिबाग रेवदंडा मार्गावर बेलकडे फाटा येथे वळणावर दोन एसटी बसला भीषण अपघात घडल्याची घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोन चालक गंभीर जखमी झाले असून १८ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही बसचे चालक हे गंभीर जखमी झाले असून एकाचे पाय तुटले असून दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तत्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत. घटनास्थळी पोलिस तसेच एस टी प्रशासन, स्थानिक यांनी धाव घेऊन जखमींना मदत केली आहे.
महाजने रेवदंडा ही बस रेवदंडाकडे जात होती. तर मुरुड बार्शी ही बस अलिबागच्या दिशेने येत होती. आक्षी येथील वळणावर दोन्ही बस समोरासमोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून एकमेकाला धडक दिली. यामध्ये महाजने रेवदंडा बसच्या चालकाच्या पायाला तर बार्शी बसच्या चालकाला पायाला गंभीर दुखापत झाली आहे. बसमधील १८ ते २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. किरकोळ जखमी प्रवाशांना उपचार नंतर सोडण्यात आले आहे. अपघातामुळे वाहतूक विस्कळित झाली होती, त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली.