सर्वाधिक शाखा असणारी सर्वात मोठी बँक बनणार, अनंत गीते यांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:13 AM2018-09-02T03:13:39+5:302018-09-02T03:13:48+5:30
१२० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशातील ७० टक्के जनता ग्रामीण भागात राहते.
अलिबाग : १२० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशातील ७० टक्के जनता ग्रामीण भागात राहते. पोस्टाच्या १ लाख ५५ हजार टपाल कार्यालयांतून सुरू होणाऱ्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकद्वारे थेट घरापर्यंत सेवा देणारी इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही सर्वाधिक शाखा असणारी जगभरातील सर्वात मोठी बँक बनणार असल्याचा विश्वास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शनिवारी व्यक्त केला.
येथील मुख्य टपाल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अलिबागचे आमदार पंडित पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील, टपाल विभागाच्या नवी मुंबई क्षेत्राच्या पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे, अलिबाग पोस्ट आॅफिसचे अधीक्षक व्ही.सी. घोलकर आदी यावेळी उपस्थित होते. गीते यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या विशेष कव्हरचे अनावरण करण्यात आले. तसेच बँकेच्या खातेधारकांना क्यू आर कोड कार्डचे वितरणही करण्यात आले.
गीते म्हणाले, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून घरापर्यंत बँकसेवा पोहोचवण्याचा उपक्रम प्रशंसनीय आहे. या बँकेसेवेमुळे ग्रामीण भागातील जनतेला तंत्रज्ञानाची ओळख तर होईलच शिवाय बँक व्यवस्थेशीही जोडण्यात मदत होईल. ज्येष्ठ नागरिकांनाही बँक सेवेचा लाभ घरबसल्या मिळेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबामुळे टपाल विभागाचा पारंपरिक चेहरामोहरा बदलून अधिकारी व कर्मचाºयांमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्र माचे प्रास्ताविक अलिबाग शाखा प्रबंधक वैभव कावरे यांनी तर मिलिंद पाटील यांनी आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन केले. यावेळी अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्र माप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे झालेल्या मुख्य सोहळ्याचे थेट प्रसारण दाखविण्यात आले.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेचे स्वागत
आ. पंडित पाटील म्हणाले, इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवेचे स्वागतच केले पाहिजे. मात्र त्याचबरोबर पोस्टाच्या इमारतींचे आणि कामगारांच्या निवासी वसाहतींचे रूप देखील बदलले पाहिजे. बँकेचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
डिसेंबरअखेर जिल्ह्यात तीनशे ठिकाणी सुविधा
नवी मुंबई विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे यांनी नव्या संकल्पनेची माहिती उपस्थितांना दिली. या शाखेअंतर्गत रेवदंडा, बोर्लीमांडला, विक्रमनगर आणि कोर्लई या चार उपशाखा शनिवारी सुरू करण्यात आल्या. डिसेंबरअखेर जिल्ह्यात तीनशे ठिकाणी ही बँक सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी अखेरीस सांगितले.