अलिबाग : अलिबाग एस टी स्थानक परिसरात एस टी बसने दुचाकी स्वारास धडक दिल्याने जयदीप बना (१६) रा. वरसोली, अलिबाग हा तरुण जागीच ठार झाला. अपघाताची माहिती कळताच वरसोलीकरानी रस्ता अडवून चालकाला हजर करण्याची मागणी उचलून धरली. त्यामुळे वातावरण तंग झाला होते. आंदोलनकर्त्यांनी एस टी बसची तोडफोड केली. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अलिबाग पनवेल ही बस सकाळी साडे अकरा वाजता अलिबाग आगारात येत होती. त्यावेळी बसच्या पुढे जयदीप हा आपली दुचाकी घेऊन जात होता. त्याचवेळी पुढे एक बस आगारात घुसत होती. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने एका रिक्षास ठोकर मारून दुचाकी स्वारास जोरदार धडक दिली. दुचाकी स्वार हा दोन बसच्यामध्ये आल्याने जागीच ठार झाला.
अपघाताची माहिती कळताच वरसोली गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बसच्या काचा जमावाने फोडल्या. अपघात केलेल्या चालकाला हजर करा अशी मागणी करून गोंगाट घातला होता. अखेर पोलिसांनी अधिकची कुमक मागवून घेतली. आर एस पी प्लाटून , एल सी बी, अलिबाग पोलीस ठाणे पोलीस असा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. मात्र जमाव हटण्यास तयार नव्हता.
अपघात झाल्यानंतर जयदीप यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. जमावाने पाच ते सहा तास रास्ता अडवून ठेवला होता. पोलीस समजावून सांगत होते तरी जमाव ऐकण्यास तयार नव्हता.