कर्जत : पुणे आणि मुंबईत राहणाऱ्या महिला बुलेट बायकर्सच्या ग्रुपने आपला दहावा वर्षगाठ कार्यक्रम कर्जत तालुक्यातील कशेळे येथे साजरा केला. कर्जत तालुक्यातील रस्त्यावरून ५० हून अधिक बुलेट गाड्यांचा ताफा आणि त्यावर स्वार झालेल्या महिला बायकर्स यांच्याकडे पाहून रस्त्यावरील सर्वच आवर्जून लक्ष देत होते.
काही वर्षांपूर्वी महिलांनी मोटारसायकल चालविणे हा प्रकार थोडा धाडसीच होता. सध्या अनेक महिला स्कुटी चालवतात, पण जिथे बुलेट चालविणे अनेक पुरुषांनाही जमत नाही, तिथे महिला सफाईदारपणे बुलेट चालविताना पाहणे नक्कीच रोमांचकारी असते. अशाच बुलेट चालविणाऱ्या महिलांच्या ‘द बाईकरनी’ ग्रुपची जानेवारी, २०११ रोजी पुण्यातील उर्वशी पाटोळे साने यांनी स्थापना केली. सुरुवातीला ग्रुपची सदस्य संख्या सहा होती. आज देशभरातील १५ विभागांत १,५०० महिला सद्दस्या असून, मुंबई ग्रुप मध्ये १५० सदस्या आहेत. पन्नास-साठ बुलेटचा ताफा हायवेवरून ग्रामीण भागात नागमोडी वळणे घेत, शिस्तीत एकामागून एक लयबद्ध रीतीने कर्जतच्या रस्त्यावरून निघला आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतो काय... मात्र, आवाजाने कानठळ्या बसणाऱ्या बुलेट गाडीवर बसून ५० रणरागिणींना काहीसे विस्मयचकीत नजरेने कर्जतकर पाहत अचंबित झाले.