बळीराज पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 03:44 AM2019-04-02T03:44:56+5:302019-04-02T03:45:12+5:30
रायगड मतदारसंघ : दोन उमेदवारी अर्ज दाखल
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात सोमवारी बळीराज पार्टीचे उमेदवार संजय पाशिलकर आणि बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार नथुराम हाते यांनी आपले उमेदवारी अर्ज रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे दाखल केले आहेत.
बी.कॉम पदवी संपादन केलेले बळीराज पार्टीचे उमेदवार संजय अनंत पाशिलकर हे रोहा तालुक्यातील दुरटोली-जामगाव येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात घोषित केल्यानुसार त्यांची जंगम मालमत्ता १५ लाख ७७ हजार रुपये आहे तर त्यांच्या पत्नी वर्षा संजय पाशिलकर यांची जंगम मालमत्ता ७ लाख ३५ हजार रुपये आहे. संजय पाशिलकर यांची स्थावर मालमत्ता २ कोटी ५२ लाख ९ हजार ६९ रुपयांची तर पत्नी वर्षा पाशिलकर यांची २१ लाख रुपयांची आहे. कोणत्याही स्वरूपाचे फौजदारी गुन्हे त्यांच्यावर दाखल नसून नोकरी व व्यवसाय हे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे.
एसएससीपर्यंत शिक्षण झालेले बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार नथुराम भगुराम हाते हे महाड तालुक्यातील वडवली-राजेवाडी येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केल्यानुसार त्यांचे उत्पन्नाचे साधन सेवानिवृत्ती वेतन आहे. त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही. त्यांची जंगम मालमत्ता १३ लाख १६ हजार १७८ रुपयांची तर त्यांच्या पत्नी वत्सला नथुराम हाते यांची ५ लाख रुपये मूल्याची आहे. दोन अवलंबितांची प्रत्येकी १ लाख ६५ हजार रुपये मूल्याची जंगम मालमत्ता आहे.
स्थावर मालमत्ता ७० लाख रुपयांची आहे. दायित्व रक्कम ८ लाख ४० हजार रुपये आहे.