अलिबाग : रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण व पनवेल या तीन तालुक्यांत टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ५३ ठिकाणी १३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात १० गावे आणि ४३ वाड्यांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यात कोट्यवधींच्या योजना राबवूनही नागरिकांच्या घशाला पडणारी कोरड मात्र कायम असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.
रायगड जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या घोषणा प्रशासनामार्फत वारंवार केल्या जातात. पाणी पुरवठ्याच्या वेगवेगळ्या योजना राबवून गावे, वाड्यांमधील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत कायमच करण्यात आला आहे. मात्र, नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुरु असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन योजना रायगड जिल्ह्यात राबविण्यात आली. प्रति व्यक्ती ५५ लीटर पाणी याप्रमाणे पाणी देण्याचा प्रयत्न झाला.
रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी झाली. पाण्याचे स्रोत शोधून त्याद्वारे गावांतील नागरिकांना पाणी देण्यासाठी अनेक गावांमध्ये योजना राबवून विहिरी, पाणी साठवण टाकी बांधण्यात आली. मात्र, आजही काही गावे पाण्यापासून वंचित आहेत. पाण्याची पातळी कमी झाल्याने धरणांमधून मातीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. अनेक गावांमध्ये दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, पेण आणि पनवेल या तीन तालुक्यांत पाण्याची समस्या आहे. ती सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत त्या गावांत टँकरने पाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या आहेत. अनेक योजना पूर्णत्वास आहेत. काही योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत.- संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद.
तालुके - गावे - वाड्या - टँकर - लोकसंख्याअलिबाग - ०२ - ०० - ०१ - ५,४३९पेण - ०२ - ३६ - ०६- ३,९४२पनवेल - ०६ - ०७ - ०६ - १२,८८४एकूण - १० - ४३ - १३ - २२,२६५