कर्जत : शहरात कचरा जाळण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू असून, नागरिकांच्या तसेच वयोवृद्धांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आता भर पडली असून, कर्जत उपजिल्हा रुग्णालय परिसरात चक्क जैविक कचरा जाळला जात असून, कर्जतच्या मुख्य शहरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोना महामारीच्या संकटामुळे अनेक नागरिकांना जीवितास मुकावे लागले, तर अनेक नागरिकांना भयंकर यातना सहन कराव्या लागल्या आहेत. अजूनही कर्जतकर कोरोना महामारीतून जात असून, शहर कोरोनाच्या महामारीपासून सावरत असतानाच शहरात जाळल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे भयंकर प्रदूषण निर्माण होत असून, भविष्यात नागरिकांना खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यात कर्जत उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथील जैविक कचरा, वापरलेले मास्क, हँडग्लोज, इंजेक्शनच्या सुया, इंजेक्शन्स, संपलेल्या सलाइनच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, औषधांची रिकामी व मुदत संपलेली भरलेली पाकिटे, कुजलेली वस्त्रे, बेडशीट इत्यादी प्रकारचा भयंकर आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा कचरा बिनदिक्कत जाळला जात आहे.कर्जत शहरातील जबाबदार असणाऱ्या शासकीय विभागांचा कचरा अशा प्रकारे सर्रासपणे जाळला जात आहे. यावर वरिष्ठ अधिकारी काहीही कारवाई वा नियोजन करत नाहीत, ही खेदजनक बाब आहे. तरी, संबंधित विभागाच्या अधिकारी नागरिकांच्या जीविताशी खेळत असलेल्या कचरा जळीतकांड प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रभाकर गंगावणे यांनी केले आहे. मात्र, कर्जत उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने कोणीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
उपजिल्हा रुग्णालयाचा जैविक कचरा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 11:21 PM