फणसाडमधील प्रगणनेत आढळली जैवविविधता

By admin | Published: May 13, 2017 01:14 AM2017-05-13T01:14:18+5:302017-05-13T01:14:18+5:30

बुद्धपौर्णिमेनिमित्त मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात ४० स्वयंसेवकांसह उपवनसंरक्षक कर्मचाऱ्यांनी वन्यप्राण्यांची प्रगणना केली.

Biodiversity found in cognitive engineering | फणसाडमधील प्रगणनेत आढळली जैवविविधता

फणसाडमधील प्रगणनेत आढळली जैवविविधता

Next

संजय करडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव/मुरुड : बुद्धपौर्णिमेनिमित्त मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात ४० स्वयंसेवकांसह उपवनसंरक्षक कर्मचाऱ्यांनी वन्यप्राण्यांची प्रगणना केली. ११ ठिकाणी करण्यात आलेल्या प्रगणनेत १८ प्रकारचे वन्यप्राणी आढळून आल्याची माहिती वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांनी दिली. यामध्ये बिबटे२, सांबर १, भेकर २, रानडुक्कर ६, शेकरू ३, पिसोरी १, काळे मांजर २, रानमांजर १, नाग १, माकडे १३, वानर १४, मोर १५, खार २ यांचा समावेश आहे. याशिवाय पक्ष्यांमध्ये ब्राऊन हेडेड बारबेट १, पोम्पाडोर ग्रीन पीजन २, भृंगराज रॅकेट टेल्ड ड्रोंग १, पाँड हेरॉन ३, ग्रे हार्नबील १, मॉटल्ड वुड आऊल १, स्किटरिंग फ्रॉग, बॉनेट मॅकॉक २, क्रि मझन रोझ १, कॉमनरोझ १, प्लेन टायगर १,कॉमनमॉरमॉन १, बार्कमॅन्टीस १,एमेराल्ड डव १, कोतवाल १, जंगल क्र ो ३, जेडर्न नाईटजार १, टिटवी ७, हरियल १, भारद्वाज ३, अल्पाईनिस्वफ्ट २, लालमिशीचा बुलबुल १, लालबुडबुड्या १, ब्राह्मणीखार २ या विविध पक्ष्यांचा अंतर्भाव आढळला.
भारतातील बहुतांशी अभयारण्ये तथा राष्ट्रीय उद्याने राजे-महाराजे व संस्थानिक यांनी त्यांच्या हौसेखातर राखून ठेवलेल्या क्षेत्रांपैकी असल्याचे आढळून येते. मुरु ड तालुक्यातील केसोलीचे जंगल हे जंजिऱ्याच्या नबाबाचे पारंपरिक संरक्षित शिकार क्षेत्र म्हणजेच आजचे फणसाड अभयारण्य होय. तब्बल ५४ चौ.कि.मी. क्षेत्रावर पसरलेले मुरु ड व रोहा तातुक्यातील फणसाड अभयारण्य १९८६ साली अधिसूचित झाले. गर्द वनराईने नटलेला डोंगराळ प्रदेश आणि २७ ठिकाणी बारमाही पाण्याचे असलेले हे क्षेत्र जैवविविधतेने समृद्ध आहे. या अभयारण्यात ७१८ प्रकारचे औषधी गुणधर्माने युक्त वृक्ष, १७/१८ प्रकारचे सस्तन प्राणी, २७ प्रकारचे सर्प, १६४ प्रकारचे रंगी-बेरंगी पक्षी, शंभराच्या घरात ब्यू मॅरिमान, मॅप आदी प्रकारची फुलपाखरे, वनसंपदा पर्यटक तसेच निसर्गप्रेमींना भुरळ घालते.
फणसाडच्या डोंगरांची उंची माथेरान, महाबळेश्वर एवढी नसली तरी येथील वनस्पतीत तीच घनता आढळते हे वैशिष्ट्य. वृक्षसंपदेमध्ये ऐन, साग, किंजळ, घावडा, अंजनी, आंबा, करंज, हेद, काजू, सावर, कुंभी, भोकर, पांगारा, पायर, उंबर,खवस,कोकम,जारूळ,मोहा,कळंब ,अर्जुन आदी प्रकारची झाडे आढळून येतात. वनामध्ये मोठमोठ्या वेली असून ५ ते ६ फुटाची गारंबीची हिरवी कंच शेंग आकर्षण ठरते. प्राण्यांमध्ये बिबट्याव्यतिरिक्त सांबर, भेकर, रानडुक्कर ,सायाळ, पिसोरी तसेच शेकरू (मोठीखार) ही आढळतात.
बुद्धपौर्णिमेप्रसंगी आयोजित प्रगणनेत सहभागी निसर्गप्रेमी स्वयंसेवकांनी टॉर्च, कॅमेरे तसेच उंच मचाणाचा वापर करीत शुभ्र चांदण्यारात्रीत जंगल मुशाफिरी करत मनमुराद आनंद लुटल्याचे निसर्गप्रेमी सर्वेश अभ्यंकर यांनी सांगितले.

Web Title: Biodiversity found in cognitive engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.