बायोगॅस प्रकल्प नादुरुस्त; लाखोंचा खर्च वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:38 AM2018-07-28T00:38:49+5:302018-07-28T00:39:10+5:30
पनवेल महापालिका पुन्हा निविदा काढणार
- वैभव गायकर
पनवेल : पनवेल नगरपरिषद अस्तित्वात असताना पनवेल शहरात मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात आलेला बायोगॅस प्रकल्प सध्या नादुरुस्त आहे. पनवेल महानगर पालिकेने वर्षभरापूर्वी प्रकल्पाच्या दुरुस्तीकरिता सुमारे तीन लाखांचा निधी देखील खर्च केला. मात्र अद्याप प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही.
२००७ मध्ये पनवेल नगरपरिषद अस्तित्वात असताना हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. ओल्या कचऱ्यावर प्रक्रि या करून तो कुजल्यानंतर त्याच्यातून बायोगॅसची निर्मिती केली जाते. या प्रकल्पाची क्षमता सुमारे ५ मेट्रिक टन एवढी आहे. २०१४ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होता. मात्र त्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे तो बंद पडला.
पनवेल महानगर पालिकेची निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी बायोगॅस प्रकल्प नव्याने सुरु केला. यावेळी डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान या प्रकल्पाचे काम पालिकेच्या मार्फत नव्याने हाती घेण्यात आले. स्वच्छ भारत सर्वेक्षणाअंतर्गत समिती येणार असल्याने पालिकेने घाईघाईत हे काम पूर्ण केले. याकरिता सुमारे ३ लाखांचा निधी खर्च केला. मात्र दुरु स्ती करून देखील बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाला नाही. सहा महिन्यांपासून हा प्रकल्प ठप्प आहे. प्रकल्पातून निर्माण झालेल्या बायोगॅसमधून प्रायोगिक तत्त्वावर पनवेल शहरातील पथदिवे प्रकाशित करण्यात येणार होते. मात्र ही सर्व संकल्पना धुळीस मिळाल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी एक एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. नजीकच्या काळात आचारसंहितेमुळे टेंडर काढता आले नसल्याने एजन्सी नियुक्त करता आली नाही. आठवडाभरात याकरिता टेंडर प्रक्रि या पूर्ण करून हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू केला जाईल.
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका
पनवेल नगरपरिषद अस्तित्वात असताना प्रकल्पाची २००७ मध्ये उभारणी करण्यात आली. २०१४ पासून बायोगॅस प्रकल्प बंद आहे. जानेवारी २०१८ मध्ये प्रकल्पाची दुरु स्ती करण्यात आली असून याकरिता ३ लाख रु पयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र तरीही अद्याप प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही.