बोर्ली पंचतनमध्ये गणेशोत्सवाची लगबग; मूर्तिकारांचे शेवटच्या टप्प्यातील काम सुरू, बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 04:43 AM2017-08-22T04:43:33+5:302017-08-22T04:43:52+5:30

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन ही महत्त्वाची बाजारपेठ असून जवळपास ४० गावांतील नागरिक या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी येत असतात.

Birthday of Ganeshotsav in Borli Pancham; The work of the final stage of the sculptors continues, the crowd in the market | बोर्ली पंचतनमध्ये गणेशोत्सवाची लगबग; मूर्तिकारांचे शेवटच्या टप्प्यातील काम सुरू, बाजारपेठेत गर्दी

बोर्ली पंचतनमध्ये गणेशोत्सवाची लगबग; मूर्तिकारांचे शेवटच्या टप्प्यातील काम सुरू, बाजारपेठेत गर्दी

Next

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन ही महत्त्वाची बाजारपेठ असून जवळपास ४० गावांतील नागरिक या बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी येत असतात. गणेशोत्सव आल्याने बोर्ली पंचतनच्या बाजारपेठेमध्ये आरास करण्यासाठी लागणाºया विविध शोभेच्या वस्तू, थर्माकोल मखरे त्याचप्रमाणे घरसजावटीच्या वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकांची दुकानांतून गर्दी आहे. जीएसटीमुळे अगरबत्तीपासून मखर, शोभेच्या वस्तू, रंग यांचे दर वाढल्याने याचा फटकाच सर्वसामान्य जनतेला बसत आहे. परंतु चालू वर्षी गणेशमूर्तींच्या किमतीमध्ये जीएसटीमुळे कोणती दरवाढ झाली नसल्याचे गणेश मूर्तिकार सांगतात. तसेच चायनामेड वस्तू विकत घेऊ नका, भारतीय बनावटीच्याच वस्तू विकत घ्या, असे आवाहन सर्व करीत असले तरी चायनामेड वस्तूंची किंमत भारतीय बनावटीच्या वस्तूंपेक्षा कमी असल्याने चायना वस्तूच जास्त विकल्या जात असल्याचे व्यापारी सांगतात.
बोर्ली पंचतन तसेच दिवेआगर, भरडखोल, वडवली, शिस्ते, वेळास, आदगाव, दिघी, गोंडघर या गावांमध्ये गणेशमूर्ती कारखाने असून यातून सुमारे १२ हजार गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत व सध्या सर्वच मूर्तिकार गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरविण्यात मग्न आहेत. मूर्तिकारांनी रात्रंदिवस जागून आकर्षक मूर्ती साकारल्या जात आहेत. बोर्ली पंचतन येथील काही नवोदित तरुण मूर्तिकार या व्यवसायामध्ये उतरले असून पेण येथून रेडिमेड मूर्ती आणून त्यांना रंग करून मूर्ती विकत आहेत. बोर्ली पंचतन येथील तीन पिढ्यांपासून मूर्ती कला जपणारे गोविलकर बंधू यांनी सध्या जीएसटी लागू झाला असला तरी गतवर्षी जेवढी किंमत मूर्तीची आकारली त्याच दरामध्ये यावर्षी देखील मूर्ती आम्ही देत आहोत यामुळे चालूवर्षी जीएसटीचा फटका नाही. त्याचप्रमाणे बोर्ली पंचतन बाजारपेठेमध्ये गणेश मखर, सजावटीच्या विविध वस्तू, आकर्षक लाइटिंग, अगरबत्ती, भिंतीचे रंग, थर्माकोलची मखरे व इतर शोभेच्या वस्तू बाजारात उपलब्ध असून त्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे. परंतु जीएसटीमुळे या सर्व वस्तू १० टक्क्यांनी महागल्या असून याचा फटका गणेशभक्तांना बसत आहे.
वस्तूंच्या छापील किमती या जीएसटी वगळून असल्याने त्यावर जीएसटी बसवून व्यापारी वस्तू विकत असले तरी पूर्वीपेक्षा यावर्षी नफा कमी मिळत असल्याचे व्यापारी सांगतात. त्याचप्रमाणे सध्या चिनी बनावटीच्या वस्तूंनी देखील बाजारपेठा व्यापलेल्या आहेत, आपण सर्वांनी सध्या यासाठी कितीही आवाहन केले की भारतीय बनावटीच्या वस्तूच खरेदी करा तरी देखील बाजारपेठेमध्ये चायनामेड वस्तूंनाच मागणी असल्याचे व्यापारी सांगतात. भारतीय बनावटीच्या वस्तू महाग असल्याने ग्रामीण भागातील नव्हे तर शहरी ग्राहक चिनी बनावटीच्या वस्तूच खरेदी करत आहेत.

Web Title: Birthday of Ganeshotsav in Borli Pancham; The work of the final stage of the sculptors continues, the crowd in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.