लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग आल्याने अनेक गावांच्या पाणी योजना अडचणीत सापडल्या आहेत. निगडे, वडघर, मोहोत, बोरगाव भावे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे.काळ नदीपात्रावर खरवली बिरवाडी गावांना जोडून कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधून काळ नदीपात्रातील पाणी अडविण्यात आल्याने पावसाळ्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा काळ नदीपात्रामध्ये जमा होतो. मात्र, यावर्षी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग चढला असल्याने पाणी दूषित होऊन झाले आहे. या पाण्यावर अवलंबून असणारी निगडे, वडघर, मोहोत, बोरगाव, भावे या गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. काळ नदीपात्राच्या बाजूला वसलेल्या खरवली, काळीज, बिरवाडी या गावांमधील सांडपाणी काळ नदीपात्रात मिसळते. त्यासोबतच अतिरिक्त एमआयडीसीमधील कारखान्यांचे प्रदूषित पाणी मिसळत असल्याने नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांच्या पाणी योजना अडचणीत सापडल्याने धरण उशाला कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
काळ नदीपात्रामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध व्हावा, याकरिता कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आला आहे. मात्र, दरवर्षी काळ नदीपात्रातील पाणी प्रदूषित होत असल्याने मोहोत, निगडे, भावे ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. याबाबत अनेकवेळा संबंधित शासकीय कार्यालये, शासकीय अधिकारी यांच्याजवळ पत्रव्यवहार करूनदेखील समस्या सुटत नसल्याने पाणी समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या विभागातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी सरपंच रामचंद्र निकम यांनी दिला आहे.