बिरवाडी : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या शीतल तांबे यांची तर उपसरपंचपदी नीलेश धारिया यांची बिनविरोध निवड झाली आहे.मंगळवारी (३ नोव्हेंबर) बिरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या शीतल तांबे यांनी सरपंचपदाकरिता अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून स्वाती सावंत तर उपसरपंचपदासाठी नीलेश धारिया यांना सूचक म्हणून अशोक कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत त्यांच्याविरोधात अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ए.व्ही. जामकर यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा मंगळवारी दुपारी ३ वाजता केली. याप्रसंगी महाडचे आ. भरतशेठ गोगावले, विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे, भारतीय कामगार सेनेचे संतोष कदम, बिरवाडी ग्रा.पं. नवनिर्वाचित सदस्य अशोक कदम आदि उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे बिरवाडी शहर अध्यक्षांनी शिवसेनेला विकासकामांकरिता पाठिंबा म्हणून राष्ट्रवादीकडून सरपंचपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. ही निवडणूक प्रथमच बिनविरोध झाली आहे. (वार्ताहर)
बिरवाडी सरपंचपदी शीतल तांबे बिनविरोध
By admin | Published: November 04, 2015 12:49 AM