'भूलथापा देत भाजप सत्तेवर आला'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 06:00 AM2019-04-19T06:00:33+5:302019-04-19T06:00:56+5:30
गांधी घराण्याने स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेले बलिदान याचा विसर मोदी सरकारला पडला आहे.
अलिबाग : भारतातील जनतेला भूलथापा मारून भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे. काँग्रेसने देशासाठी काहीच केले नाही असे म्हणणाऱ्यांनी गांधी घराण्याने स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेले बलिदान याचा विसर मोदी सरकारला पडला आहे. त्यामुळे मोदींना असा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच नाही असा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांची प्रचारसभा अलिबाग येथील समुद्रकिनारी पार पडली. त्या सभेत पवार बोलत होते. आज भारताने जी प्रगती केली आहे ती काही मोदी सरकारच्या पाच वर्षांत झालेली नाही, असे कोणी मानत असले तर तो त्यांचा मूर्खपणा ठरेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. नोटाबंदी करून काळा पैसा परत काही आलाच नाही. अच्छे दिनची स्वप्न दाखवत सत्तेवर आले. जनता आता त्यांना जाब विचारत असल्याने मोदी सरकारची भाषा आता बदललेली आहे. अपयश लपवण्यासाठीच ते भारतातील नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आता ते गांधी घराण्यावर निशाणा साधत आहेत, तसेच त्यांनी आता पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला असल्याची टीका पवार यांनी आपल्या खास शैलीत केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दैनंदिन झाल्या आहेत. देशातील शेतीचे उत्पादन घटले आहे. सत्ता बहाल केल्यास शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करू, असे आश्वासन पवार यांनी दिले. शिवसेना पक्षप्रमुखांनी सहा महिने आधी एकटे लढण्याची भाषा केली. अमित शहा यांना अफजल खानाची उपमा दिली. त्यांच्याबरोबरच त्यांनी आता गळाभेट केली असा सवाल त्यांनी करून उद्धव ठाकरे यांचा त्यांच्याच शब्दावर भूमिकेवर विश्वास नाही. सत्तेसाठी ते कोणतीही तडजोड करतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
‘मोदींच्या डोक्यात सत्तेची हवा’
जनतेला मोठी स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदी यांनी सत्ता मिळविली. परंतु सत्तेत आल्यानंतर पंतप्रधानपदाचा त्यांनी मान ठेवला नाही. त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. कर्जतमध्ये गुरुवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, काँग्रेसने देशासाठी फार काही केले आहे. इंदिरा गांधींनी देशाचा भूगोल बदलला. राजीव गांधींनी संगणक क्रांती घडविली. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या हत्या हा देशासाठी त्याग नाही का? असेही ते म्हणाले.