लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: रायगड लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर पुन्हा एकदा भाजपने रणशिंग फुंकले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रायगडची जागा भाजपलाच मिळावी, असा सूर लावला. विद्यमान खासदार सुनील तटकरे असले तरी त्यांना मदत करणारे त्यावेळेचे किती आमदार त्यांच्यासोबत आहेत, असा सवाल जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी उपस्थित केला.
भाजपची ताकद अधिक असेल तर उमेदवारी का मागू नये, असा सवालही त्यांनी केला. भाजपच्या कार्यकर्त्यांची असलेली इच्छा वरिष्ठांकडे मांडणार असल्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले आहे. रायगड मतदारसंघातील अलिबाग, मुरूड विधानसभा मतदारसंघातील बूथ कार्यकर्ता मेळावा सोमवारी अलिबाग येथे झाला. धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याबाबतचा सूर बैठकीत उमटला. खा. तटकरे हे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार नको, असे मत शिवसेना आमदारांचे आहे, अशी भूमिका ॲड. महेश मोहिते यांनी मांडली.
आजी, माजी खासदारांनी काय केले?
प्रत्येक घटकाला पुढे नेण्याचे काम मोदी करीत आहेत. केंद्राने सर्व घटकांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. मात्र, या योजना आजी, माजी खासदारांनी पाच ते दहा वर्षांत जनतेपर्यंत दिल्या का, तर उत्तर नकारात्मक आहे, असा टोला पाटील यांनी सुनील तटकरे यांना लगावला. केंद्राच्या योजना पोहोचविण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी केंद्रात देणे गरजेचे आहे. भविष्यात विकासाचे केंद्र रायगडकडे वळत आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आपला माणूस पुढे न्या - आ. ठाकूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य जनतेसाठी झटत आहेत. लोकांची विकासकामे करून भाजप पुढे जात आहे. मात्र, निवडणुका आल्या की आपण दुसऱ्या पक्षांचा प्रचार करून त्यांना पुढे नेत आहोत आणि आपण मागे राहत आहोत. त्यामुळे यावेळी आपला माणूस पुढे जाणे अपेक्षित आहे, असे मत आ. प्रशांत ठाकूर यांनी मेळाव्यातून व्यक्त केले.