मधुकर ठाकूर
उरण : न्हावा ग्रामपंचायत निवडणुकीत महाआघाडीत बिघाडी झाली आहे. बिघाडीमुळे शेकाप- सेना तर भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत थेट लढत होणार आहे. एक कोटी उत्पन्न असलेली आणि सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेली न्हावा ग्रामपंचायत सधन म्हणून ओळखली जाते.त्यामुळे ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाची सत्ता असावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा खटाटोप सुरू आहे.मागील निवडणूकीत शेकाप-भाजप-कॉग्रेस आघाडीची सत्ता होती.मात्र या आघाडीला नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविता आलेल्या नाहीत.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्य, अंतर्गत गटारांची समस्या नागरिकांना कायमच सतावते आहे.
न्हावा ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ११ असुन थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.यापैकी शेकाप -६, शिवसेना-५ तर एका अपक्ष उमेदवाराला शेकापने पाठिंबा दिला आहे.आघाडीतुन सरपंचपदासाठी सेनेच्या रविंद्र नारायण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती शेकाप -शिवसेना आघाडीचे सर्वेसर्वा जितेंद्र म्हात्रे यांनी दिली तर महाआघाडीतील कॉग्रेस- राष्ट्रवादीने सत्तेसाठी भाजपबरोबर सोयरिक साधली आहे.या आघाडीतुन ११ सदस्यांच्या जागांपैकी भाजप-५,कॉग्रेस-२, राष्ट्रवादी-३ लढवित आहे.सरपंच पदासाठी भाजपचे विजेंद्र गणेश पाटील हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत.उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावा-न्हावाखाडी पॅनेलच्या नावाखाली निवडणूक लढविली जात आहे. भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढविली जात आहे.
रामशेठ ठाकूर यांनी स्वखर्चातून बांधलेली एक लाख लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी, व्यायाम शाळा,समाज मंदिर,न्यु इंग्लिश स्कूल नुतनीकरण, महिला मंडळ कार्यालय आदी विकासकामांच्या मुद्यावर ही निवडणूक लढविली जात असल्याचे भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे व माजी सरपंच हरेश म्हात्रे यांनी सांगितले.आघाडीतील बिघाडीमुळे भाजप-कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरपंच पदासह नऊ सदस्य विजयी होतील असा विश्वासही हरेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविली जात आहे. एकूण मतदान ३२३२ असुन यापैकी २००० मते घेऊन शिवसेनेचे रविंद्र पाटील सरपंचपदी निवडून येतील.तर ११ पैकी ८ उमेदवार सदस्यपदी निवडून येतील. त्यामुळे न्हावा ग्रामपंचायतीवर शिवसेना -शेकापचीच सत्ता स्थापन होईल असा विश्वास शेकाप -शिवसेना आघाडीचे सर्वेसर्वा जितेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. मात्र महाआघाडीतील बिघाडीसाठी जागा वाटप हाच कळीचा मुद्दा ठरला आहे.यासाठी शेकाप -शिवसेना आघाडीचे जितेंद्र म्हात्रे आणि रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी परस्परांना दोष दिला आहे.