- मधुकर ठाकूर
उरण : उरण तालुक्यातील जासई, दिघोडे चिरनेर, न्हावा आदी चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाआघाडी विरोधात भाजप असाच सामना रंगणार आहे.सत्ता स्थापनेसाठी मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या पुढारी, नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे.मात्र सर्वच उमेदवारांचे निवडणुकीतील भविष्य मतदारांच्या होणाऱ्या मतदानावरच अवलंबून आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत महाआघाडी विरोधात भाजप असा सामना रंगणार आहे. सरपंचासह १७ जागांसाठी पाच प्रभागातुन ३० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.पाच प्रभागाची एकूण मतदार संख्या ४८४० आहे.प्रभाग क्रमांक ४ मधुन महाआघाडीच्या भारती मनोज ठाकूर या याआधीच बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.धनदांडग्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांमुळेच मागील काही वर्षांपासून ऐतिहासिक चिरनेर गावाला पावसाळ्यात सातत्याने पुराचा सामना करावा लागत आहे.हाच निवडणूकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनला असून भाजपला डोकेदुखी ठरू लागला आहे.मात्र दोन्हीकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे.
दिघोडे ग्रामपंचायतीत सत्ताधारी भाजप विरोधात कॉंग्रेस, शेकाप आघाडी अशीच लढत होणार आहे. मागील निवडणुकीत ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता स्थापन केली होती.मात्र निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता भाजपच्या सत्ताधाऱ्यांना करता आली नसल्याचा आरोप कॉंग्रेस -शेकाप आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार किर्तीनिधी ठाकूर यांनी केला आहे.तर केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीत ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.या ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या ९ तर थेट सरपंचपद अशा १० जागांसाठी निवडणूक होत आहे.विशेष म्हणजे सरपंच पदासाठी चार उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.तर सदस्यांच्या ९ जागांसाठी तीन प्रभागातून एकूण १९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.या ग्रामपंचायतींमध्ये एकूण मतदारांची संख्या २१७७ आहे.
जासई लोकनेते दिवंगत दिबांचे जन्मगाव.या ग्रामपंचायतींमध्ये सर्वपक्षीय इंडिया महाआघाडी विरोधात भाजप अशी लढाई आहे.सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीची थेट सरपंच आणि १७ अशी १८ सदस्य संख्या आहे.यामधुन इंडिया महाआघाडीच्या सृष्टी म्हात्रे यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे उर्वरित १६ सदस्यपदासाठी ३४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.या मतदार संघात ४१८२ मतदार आहेत.आंदोलनाचे जासई प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते.संघर्षाचा इतिहास असलेल्या जासई ग्रामपंचायतीवर वर्चस्वासाठी सर्वपक्षीय इंडिया महाआघाडी विरोधात भाजप अशी लढाई आहे.मात्र नवख्या उमेदवारांवर मतदार कितपत विश्वास टाकतात यावरच भाजपचे निवडणुकीतील भविष्य अवलंबून आहे.
न्हावा ग्रामपंचायतीमध्ये भाजप-कॉग्रेस आघाडीच्या विरोधात भाजप प्रणित उत्कर्ष ग्रामविकास मंडळ न्हावा -न्हावाखाडी पॅनेल अशी अत्यंत चुरशीची लढत होणार आहे.या ग्रामपंचायतीत थेट सरपंच आणि ९ सदस्यपदासाठी निवडणूक होत आहे.सरपंचासाठी दोन तर ९ सदस्यपदासाठी १८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.या ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागाची मतदार संख्या ३२३२ आहे.जागा वाटपात एकमत झाले नसल्याने कॉंग्रेसने महाआघाडीशी फारकत घेऊन भाजपशी सोयरिक साधली आहे.त्यामुळे निवडणूक चांगलीच चुरशीची झाली आहे.त्यातच निवडणूकी दरम्यान दोन्ही गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेत दोन्ही गटातील कार्यकर्ते रक्तबंबाळ झाल्याने तणावाच्या वातावरणात मतदान पार पडणार आहे. निवडणूकीत विजयी मिळवण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये विविध राजकीय पक्षांच्या प्रचार रॅली,सभा घरोघरी जाऊन प्रचाराचा धुरळा उडविला आहे.मतदारांना आमिषे दाखवून आकर्षित करण्यासाठी आटोकाट प्रयत्नही केले आहेत.मात्र सुजाण, सुशिक्षित मतदार कुणाला मतदान करतात या वरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीच्या मतदानाकडे सर्वाचेच लक्ष लागून राहणार आहे.