पनवेल : मुंबई महापालिकेसह इतरही महापालिका निवडणुकांच्या घोषणा होऊनही अजून निवडणुका घेतल्या जात नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत, कारण निवडणुकांना भाजप घाबरलेली आहे. लोकांच्या मनात भाजप विरोधात राग आहे. महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी पनवेल येथील इंटकच्या मेळाव्यात केले.
आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. अमृतमहोत्सवी वर्षात काँग्रेसचे सरकार ६० वर्षे चालल्याने काँग्रेस आणि पंडित नेहरूंचे योगदान विसरता येणार नसल्याचेही ते म्हणाले. कामगारांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. यासाठी देशाला आणि कामगारांना न्याय देण्यासाठी इंटकची देशाला गरज आहे. २०२४ ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल. कारण काँग्रेस सत्तेत आली पाहिजे, ही जनभावना आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देशाचे संविधान संपवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप ईडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असा दावा त्यांनी केेला.याप्रसंगी इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, राष्ट्रीय इंटक उपाध्यक्ष आर. पी. भटनागर, माजी आमदार हुस्नबानू खलि, शशिकांत बांदोडकर उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांची वापसीकाँग्रेसमधून वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील यांनी पुन्हा पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ताहीर पटेल, अमित लोखंडे, शशिकला सिंह, अस्मिता पाटील, हरपिंडर वीर, सुदेशना नारायते, विनीत कांडपिळे, जयश्री खटकाले, शीला घोरपडे, सुनीता माळी यांनीही घरवापसी केली.