अलिबाग
भाजपा नेते किरीट सोमय्या आज त्यांनी जाहीर केल्यानुसार कोर्लई गावात ग्रामपंचायत आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले. किरीट सोमय्या गावात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ग्रामपंचायत भागात केला होता. मोठ्या संख्येने शिवसैनिक ग्रामपंचायत परिसरात जमा झाले होते. तर सोमय्यांसोबत भाजपा आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपाचे कार्यकर्ते ग्रामपंचायतीत दाखल झाले. यावेळी ग्रामपंचायतीत भाजपाचे झेंडे घेऊन जाण्यास शिवसैनिकांनी विरोध केला आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलं होतं. शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्त्यांकडून यावेळी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. कोर्लई ग्रामपंचायतीच्या परिसरात जवळपास अर्धा तास हा संपूर्ण ड्रामा सुरू होता.
किरीट सोमय्या यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन शिवसेनेचे सरपंच प्रशांत मिसाळ यांच्याकडे एक पत्रक दिलं आणि ते तिथून निघाले. यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच किरीट सोमय्या ग्रामपंचायतीला भेट देऊन निघाल्यानंतर शिवसैनिकांकडून गोमूत्र शिंपडून ग्रामपंचायत कार्यालयाचं शुद्धीकरण देखील करण्यात आलं. किरीट सोमय्या केवळ नौटंकी करत असून केवळ ड्रामेबाजी सुरू असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.
कोर्लई ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर किरीट सोमय्यांचा ताफा रेवदंडा पोलीस ठाण्याच्या दिशेने वळाला. सोमय्या यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कोर्लई गावातील कथित जमीन व्यवहाराबाबत योग्य माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात येत नसल्याची तक्रार करत याप्रकरणात लक्ष घालण्यासंबंधीची तक्रार दिली. ग्रामपंचायतीकडून याआधी १९ बंगले असल्याची कागदपत्र देण्यात आली होती. पण आता ग्रामपंचायतीकडून या जागेवर कोणतेच बंगले नाहीत असं सांगितलं जात आहे. मग हे बंगले नेमके कुठे हरवले? असा सवाल उपस्थित करत किरीट सोमय्या यांनी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालावं यासाठी निवेदन दिल्याचं सांगितलं आहे.
सोमय्या निघून जाताच ग्रामपंचायतीचं शुद्धीकरणकिरीट सोमय्या ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. पंचायत कार्यालयात सोमय्या गेले आणि पाचच मिनिटांत ते बाहेर आले. सोमय्या यांनी सरपंच मिसाळ यांना नमस्कार केला आणि खुर्चीत बसले. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी एक पत्रक ग्रामपंचायतीला दिलं. त्यानंतर किरीट सोमय्या आणि प्रशांत ठाकूर कार्यालयाबाहेर आले. सोमय्यांनी ग्रामपंचायतशी एकाशब्दानंही चर्चा केली नाही किंवा कोणत्याही माहितीची विचारपूस केली नाही. ते केवळ ड्रामेबाजीसाठी आले होते, अशी टीका सरपंच प्रशांत मिसळ यांनी केली आहे. किरीट सोमय्या तिथून निघून जाताच शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीचं गोमूत्र आणि दूध शिंपडून शुद्धीकरण केल्याचंही मिसाळ यांनी सांगितलं.