रायगड, मावळमध्ये भाजपची मोर्चेबांधणी, शिंदे गट म्हणतो युतीधर्मानुसार आम्हीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 09:24 AM2023-06-13T09:24:24+5:302023-06-13T09:24:38+5:30
शिवसेनेत दुही निर्माण झाल्याने दोन्ही मतदारसंघात भाजपने लोकसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: जिल्ह्यात रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघ हे भाजप-शिवसेना युती काळात शिवसेनेकडे होते. मात्र, शिवसेनेत दुही निर्माण झाल्याने दोन्ही मतदारसंघात भाजपने लोकसभेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर शिंदे आणि ठाकरे गट मात्र, लोकसभा निवडणुकीत आपले मतदारसंघ मित्र पक्षाला सोडणार का, अशी चर्चा सध्या रंगली आहे.
भाजप आणि शिवसेना यांची युती असल्याने २०१४ आणि २०१९ मध्ये रायगड, मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले होते. रायगडमध्ये २०१४ मध्ये युतीचे अनंत गिते हे विजयी झाले होते. तर २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विजयी झाले होते. मावळ मतदारसंघ दोन्ही वेळेला शिवसेनेने राखला होता. त्यामुळे युतीच्या आघाडी धर्माने दोन्ही मतदारसंघ हे शिवसेनेकडे असायला हवेत. मात्र २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप दोन्ही मतदारसंघांत उमेदवार लढविण्याची तयारी करीत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप यांची युती संपुष्टात आली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी स्थापन झाली. तीन पक्षांचे सरकार राज्यात स्थापन झाले. मात्र, सेनेत दुफळी निर्माण होऊन अडीच वर्षाने शिंदे गट व भाजप सत्तेत आले. रायगडचे राजकारणही बदलले. येथे शिंदे गटाचे तीन व भाजपचे तीन असे बलाबल आहे. त्यामुळे येथे भाजपची लोकसभेची तयारी सुरू आहे.
शिंदे गटाला अंधारात ठेवून दीड वर्षापासून भाजपची मोर्चे बांधणी सुरू आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूकप्रमुख म्हणून भाजपने सतीश धारप यांना तर मावळसाठी आ. प्रशांत ठाकूर यांना जबाबदारी दिली आहे,
रायगड आणि मावळ हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. भाजप जरी दोन्ही मतदारसंघात तयारी करीत असले तरी युतीप्रमाणे हे शिवसेनेलाच मिळाले पाहिजे आणि ते आम्हाला मिळतील. काही ठिकाणी अदलाबदल होऊ शकते. वरिष्ठ पातळीवर याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल. - महेंद्र दळवी, शिंदे समर्थक आमदार, अलिबाग