मुरुडमधील बंदला भाजपचा विरोध; नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 11:59 PM2020-06-29T23:59:37+5:302020-06-29T23:59:45+5:30
पत्रकार परिषद घेऊन नोंदविला आक्षेप
मुरुड : अॅक्टिव्ह मेंबरच्या नावाने संपूर्ण मुरुड शहर तीन दिवस बंद करून भाजीपाला व मासळीचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाने बंदबाबत कोणतेही आदेश दिले नसताना, समूहाने फिरून दहशत निर्माण करून अॅक्टिव्ह मेंबर नावाने हा बंद पुकारला. त्यामुळे हा बंद बेकायदा असून, हजारो नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांचा निषेध भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष महेश मानकर यांनी बंदबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. सोशल मीडिया व शिवसेनेच्या फलकावर तीन दिवसीय बंदचे आव्हान करतेवेळी मनसे व शिवसेनेचा उल्लेख आढळून आला आहे. त्यामुळे हा बंद अॅक्टिव्ह मेंबरचा नसून या दोन राजकीय पक्षांचा असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. संचारबंदीमुळे एक तर लोक चार महिने घरात बसून आहेत. लोकांच्या हाताला काम नाही, अशा वेळी बेरोजगारी वाढत असून, बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला असून, शेतकºयांना शेतीची अवजारे खते व बियाणे विकत घ्यावयाची आहेत, अशा बंदमुळे शेतकरी खूप त्रस्त आहेत.
यावेळी अमीन खानजादा यांनी बंदपेक्षा बाहेरून येणाºया लोकांवर बंदी घाला, म्हणजे रुग्णसंख्या वाढणार नाही, असे सूचित के ले. यावेळी मुरुड शहर अध्यक्ष उमेश माळी यांनी बंदमध्ये मेडिकल व दूध अशा अति आवश्यक सेवा बंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे नागरिकांचे हाल झाले आहेत, असे सांगितले. यावेळी मुरुड शहर अध्यक्ष उमेश माळी अमीन खानजादा, बाळा गुरव, अभिजित पानवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या मुरुड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी बाजारपेठ बंद केल्याने लोकांच्या वर्दळीस प्रतिबंध येतो, याबाबत आम्ही व्यापारी लोकांना भेटून विनंती केली. त्यांना कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत माहिती दिली. आमचे म्हणणे त्यांना पटले व त्यांनी स्वत:हून दुकाने बंद केली आहेत. आम्ही कोणावरही जबरदस्ती अथवा सक्ती केलेली नाही. व्यापाºयांनी सहकार्य केल्यामुळेच आज मुरुडमध्ये बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे. - कुणाल सतविडकर, अॅक्टिव्ह मेंबर