भाजपने आधी स्वत:चा पक्ष बांधावा: राज ठाकरे, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत संताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 06:07 AM2023-08-17T06:07:19+5:302023-08-17T06:07:37+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख करताच अजित पवार भाजपमध्ये गेले. आता ते लपून गाडीत जातात, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

bjp should build its own party first said raj thackeray and outrage over mumbai goa highway condition | भाजपने आधी स्वत:चा पक्ष बांधावा: राज ठाकरे, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत संताप 

भाजपने आधी स्वत:चा पक्ष बांधावा: राज ठाकरे, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत संताप 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल : अमित ठाकरे एका मार्गावरून जात असताना टोल नाका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यावर भाजपने रस्ते बांधायला आणि उभारायला शिका, अशी टीका मनसेवर केली होती. या टीकेला बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिकावे, असा सल्ला देत भाजपवर टीका केली. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित निर्धार मेळाव्यात ठाकरे बोलत होते. 

२०२४ पर्यंत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री सांगतात. मग आताचे काय, माणसे मेली त्याचे काय? गणेशोत्सवात जाताना पुन्हा याच दुरवस्था झालेल्या मार्गांवरून कोकणवासी जातील का, अशी टीका ठाकरेंनी सरकारवर केली. रस्ते व्यवस्थित केले तर पैसे खायला कसे मिळणार, तो सहा महिन्यांत खराब व्हायला पाहिजे. तेव्हाच टेंडर, टक्केवारी, कंत्राट मिळेल हा धंदा सुरूच असून हे कुठे तरी थांबायला हवे. मुंबई - गोवा महामार्गाबाबत गडकरींना विचाराल तर ते सांगतात कंत्राटदार पळून गेला. 

मी भाषण करायला आलो नाही, मी तुम्हाला झेंडा दाखवायला आलो असल्याचे सांगून मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला. चंद्रयान चंद्रावर जाऊन उपयोग काय, तिथे जाऊन खड्डेच बघायचे होते तर ते चंद्रयान महाराष्ट्रात सोडायचे होते, महाराष्ट्रातही खड्डे दिसले असते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. २००७ सालापासून काँग्रेसनंतर कोणाकोणाचे सरकार आले. मात्र, या खड्ड्यातून जात असताना तेच तेच लोकप्रतिनिधी का निवडता? खोटे आश्वासन दिलेल्या नेत्यांवर विश्वास का ठेवता, असा प्रश्न त्यांनी केला. कोकणवासीयांनी थोड्याशा पैशासाठी आपल्या जमिनी विकू नयेत, असे आवाहनही यावेळी कोकणवासीयांना केले.

२५०० जीव गेले

२००७ साली सुरू झालेला मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर आजपर्यंत १५ हजार ५६६ कोटी रुपये खर्च झालेत. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आजपर्यंत २५०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, रस्त्याचे काम अर्धवटच असून जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करतात तरी काय, असा संतप्त सवाल केला.

आरोप होताच अजित पवार भाजपमध्ये

सध्याच्या राजकारणावरही राज ठाकरेंनी असूड ओढले. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख करताच अजित पवार भाजपमध्ये गेले. आता ते लपून गाडीत जातात, असा टोला लगावला. मिझोरम, आसाम, मणिपूर, हिमाचल प्रदेश या ठिकाणी जमिनी घेऊन दाखवा. मात्र, महाराष्ट्रात सगळीकडून लोक येत आहेत, असे ते म्हणाले.

 

Web Title: bjp should build its own party first said raj thackeray and outrage over mumbai goa highway condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.