- मधुकर ठाकूरउरण - माजी आमदार मनोहर भोईर यांची उरण मतदार संघात विकास कामांची पाटी कोरीच राहिली आहे.या उलट मतदार संघात कोट्यावधी रुपयांच्या निधींचा वापर करून शेकडो विकासकामे केली आहेत. लोकांची कामेही महेश बालदी मनापासून करीत आहेत.त्यामुळे शनिवारी (१०) पक्षप्रवेशाचा ओघ पाहता आगामी निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघातुन मनोहर भोईर यांचा महेश बालदी हे ५० हजार नव्हे तर आता एक लाख मतांच्या फरकाने पराभव करतील असा दावा भाजपचे आमदार रायगड जिल्हा प्रमुख तथा नवनिर्वाचित मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रशांत ठाकूर यांनी उरण येथील जाहीर कार्यक्रमातून केला.
उरण भाजपने शनिवारी (१०) कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भाजपचे आमदार रायगड जिल्हा प्रमुख तथा नवनिर्वाचित मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जेएनपीएच्या बहुउद्देशीय सभागृहात शनिवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उरण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.शेकापवर टीका करताना शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी कर्नाळा बॅक बुडविली.त्यामध्ये कष्टकरी,शेतकरी, कामगार आणि गोर-गरीबांचे ५२५ कोटी रुपये बुडवले.सामान्यांचे घामाचे पैसे बुडविणारे माजी आमदार दोन वर्षांपासून तुरुंगात खितपत पडले आहेत.त्यांच्या मुलाचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.कर्नाळा बॅकेतील खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यत लढत राहणार असल्याची ग्वाही देतानाच मतदार संघातील विविध गावांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून दिली.यावेळी त्यांनी निवडणूकीसाठी सज्ज होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याआधी उरण मतदार संघात इतक्या वर्षात फक्त ५०० घरकुल उभारण्यात आली आहेत.आता केंद्र, राज्यात पक्षांची सरकारे आहेत.या दोन्ही सरकारच्या जोरावर आदिवासी बांधवांसाठी ४००० घरकुल बांधणार असल्याची ग्वाही उरणचे आमदार महेश बालदी यांनी आपल्या भाषणातून दिली.उरण-नेरुळ रेल्वे मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.त्यामुळे रेल्वे सुरू झाल्यावर तर उरण मतदार संघात रोजच परिवर्तन पाहावयास मिळेल असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी माजी आमदार मनोहर भोईर यांच्यावर गावाचेही भलं न करणार आमदार म्हणून टीका केली. कामाचं,विकास कामाबद्दल बोला.व्यर्थ टिका करु नका असा सल्ला देतानाच कार्यकर्त्यांचा विश्वास, केलेल्या विकास कामांच्या बळावर प्रगती साधत पुढे वाटचाल करत असल्याचे महेश बालदी यांनी सांगितले. या आयोजित कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रमात उरण मतदार संघातील काही गावांतील अन्य राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.पक्षप्रवेशकर्त्यांचे उपस्थित आमदारांनी स्वागत केले.