चिरनेर ग्रामपंचतीच्या निवडणूकीत महाआघाडी विरोधात भाजप सरळ लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 04:13 PM2023-10-29T16:13:52+5:302023-10-29T16:14:47+5:30
थेट लढतीमुळे मात्र निवडणूकीत आणखीनच रंगत वाढली आहे.
मधुकर ठाकूर
उरण : ऐतिहासिक चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना, शेकाप, कॉंग्रेस महाआघाडी विरोधात भाजप असा आमनेसामने सामना रंगणार आहे. थेट लढतीमुळे मात्र निवडणूकीत आणखीनच रंगत वाढली आहे. ऐतिहासिक चिरनेर ग्रामपंचायतीची लोकसंख्या १० हजारांपर्यंत आहे.५० लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या चिरनेर ग्रामपंचतीच्या निवडणूकीत थेट सरपंच आणि १५ सदस्यपदासाठी निवडणूक होत आहे.या निवडणुकीत शिवसेना, शेकाप, कॉंग्रेस या तीन पक्ष मिळून महाआघाडी स्थापन केली आहे. गावाच्या विविध विकासाच्या मुद्यांवर निवडणुकीला महाआघाडी सामोरे जात आहे.महाआघाडीच्या तगड्या आव्हानाविरोधात भाजपनेही षंढ ठोकले आहे.विविध राजकीय पक्षातील नाराज झालेले भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तेच उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.यामध्ये काही नवख्या, नवोदित तरुण उमेदवारांचाही भरणा आहे. ग्रामपंचतीच्या निवडणूकीत थेट सरपंचपदासाठी २ तर १४ सदस्यपदासाठी २८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.त्यामुळे ५ नोव्हेंबर रोजी सरळ समोरासमोर होणाऱ्या रंगतदार लढतीसाठी
महाआघाडी विरोधात भाजप असा सामना रंगणार आहे.या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांची संख्या ४८४० आहे.विशेष म्हणजे ज्यांच्या अनधिकृत बांधकामांमुळे चिरनेरकरांना मागील तीन चार वर्षांपासून पावसाळ्यात महापुराचा सामना करावा लागत आहे.त्यांच्या विरोधात जनमताचा आक्रोश आहे. त्याच धनदांडग्यांच्या खांद्यावर भाजपने चिरनेरच्या निवडणुकीचा धुरा सोपवली आहे.यामुळे आधीच रोष असलेल्या चिरनेरच्या मतदारांमध्ये भाजप विरोधात असंतोष आणखीनच वाढला आहे.या असंतोषाचा फटका निवडणुकीआधीच भाजपला बसला आहे.उमेदवार देता आला नसल्याने प्रभाग क्रमांक ४ मधुन महाआघाडीच्या भारती मनोज ठाकूर या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.
महाआघाडीने सरपंच पदासाठी अनुभवी, मितभाषी आणि उरण पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल यांची उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपनेही नवोदित, तरुण तडफदार प्रतिक गोंधळी यांना उमेदवारी दिली आहे.मात्र निवडणुकीत भाजपचे उमेदवार तीन पक्षाच्या बलाढ्य महाआघाडीच्या उमेदवारांसमोर कितपत टिकाव धरतात यावरच त्यांचे यश-अपयश अवलंबून आहे.
महाआघाडीचे भास्कर मोकल भाजपच्या नवख्या उमेदवाराचा पराभव करून जवळपास ३००० मते घेऊन विजयी होतीलच.त्याच बरोबर महाआघाडीचे १४ सदस्य निवडून येतील. धनदांडग्यांच्या बळावर निवडणूक लढविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत मतदार भुईसपाट करतील असा ठाम विश्वास शिवसेनेचे उरण तालुका प्रमुख तथा आघाडीचे प्रवक्ते संतोष ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. महाआघाडीला भाजपने स्वबळावर निवडणूक तगडे आव्हान दिले आहे.सर्वच उमेदवार विजयी होतील यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाला मिळणाऱ्या मतांचा अंदाज घेणेही शक्य होणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भोईर यांनी व्यक्त केली आहे.