लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत / पेण : रायगड लोकसभा मतदारसंघ हा भाजपलाच मिळायला हवा, असा आग्रह पेणमधील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे धरला. त्यानंतर सावंत यांनी कोकणात अजून कमळ फुलले नाही, आता रायगड, मावळ आणि सिंधुदुर्ग तीनही लोकसभा मतदारसंघ भाजपलाच मिळावेत, यासाठी मी केंद्रीय नेतृत्त्वाकडे शंभर टक्के प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.
कर्जत येथे माजी मंत्री बाळा भेगडे, सुरेश लाड, प्रशांत ठाकूर यांनी तीनही विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच आमदार निवडून येतील, असे सांगत मावळचा उमेदवार दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, असा विश्वास यावेळी बोलून दाखवला. पेण येथे बाळासाहेब पाटील यांनी कोकणातील तीनही मतदारसंघात लोकसभा उमेदवार भाजपचे उमेदवार पाहिजेत, अशी मागणी केली. त्यानंतर धैर्यशील पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी मिळावी, ही माझी व कार्यकर्त्यांची इच्छा असून, आमचा निरोप वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार रवी पाटील यांनी रायगड लोकसभेची जागा आम्हाला द्या, नाहीतर आम्ही वेगळी भूमिका घेऊ, असे यावेळी सूचित केले.
‘विकासाच्या नावावर मते मागा’डॉ. प्रमोद सावंत हे मंगळवारी रायगड दौऱ्यावर होते. मावळ लोकसभा मतदारसंघाचे बूथ कार्यकर्ता महासंमेलन कर्जतच्या किरवली येथे आयोजित केले होते, तर पेण येथे बुथ कार्यकर्ता मेळावा होता. या दोन्ही ठिकाणी सावंत यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतका विकास केला आहे, की जात, धर्माच्या नावावर नाहीतर विकासाच्या नावावर मते मागायची आहेत, असे आवाहन त्यांनी केले.