रायगडमध्ये भाजपच्या स्वबळावरील निर्णयाचा महायुतीला जाेरदार फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:15 PM2023-11-07T12:15:03+5:302023-11-07T12:15:27+5:30
इंडिया आघाडी, भाजपला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाजपने अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढल्याने त्याचा महायुतीला फटका बसल्याचे दिसून आले.
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २१० पैकी ३१ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. अन्य १७९ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट आघाडीवर असून, त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने बाजी मारली आहे. इंडिया आघाडी, भाजपला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भाजपने अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढल्याने त्याचा महायुतीला फटका बसल्याचे दिसून आले.
राज्यातील सत्तेत सहभाग असला तरी शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, भाजप यांनी अनेक ठिकाणी स्वतंत्र, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत दिली. इंडिया आघाडीही काही ठिकाणी आघाडी, तर काही ठिकाणी विरोधात लढाई झाली. मात्र, जिल्ह्यातील मतदारांनी युतीच्या पारड्यात भरघोस मते टाकली.
इंडिया आघाडीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाड मतदारसंघात शिंदे गटाने वर्चस्व राखल्याचे चित्र आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी, अलिबाग मतदारसंघात शिंदे गटाला फटका बसला आहे. पेण मतदारसंघात भाजपने बाजी मारली असून, ठाकरे गटालाही काही प्रमाणात यश मिळविता आले आहे.
मात्र, अनेक ठिकाणी सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने त्याचा फायदा हा विरोधकांना मिळाला आहे.
जिल्ह्यातील निकालाची आकडेवारी
एकूण ग्रामपंचायती २१०
जाहीर निकाल २१०
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - ५०
शिंदे गट ६४
भाजप २६
उबाठा २०
शेकाप ३२
काँग्रेस ०३
शरद पवार गट ०३
आघाडी व इतर १२