शिवाजी महाराजांबद्दलचे भाजपाचे प्रेम बेगडी, संभाजी ब्रिगेडची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:03 AM2018-10-25T00:03:05+5:302018-10-25T00:03:21+5:30
भाजपाने पाच वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केली होती. आता निवडणुकांच्या तोंडावर स्मारकाची वीट लावण्यात येत आहे.
अलिबाग : भाजपाने पाच वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केली होती. आता निवडणुकांच्या तोंडावर स्मारकाची वीट लावण्यात येत आहे. भाजपाला शिवाजी महाराजांबद्दल खरोखरच एवढे प्रेम होते, तर स्मारकाच्या बांधणीला उशीर का केला? भाजपाचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम हे बेगडी आहे, असा घणाघाती हल्ला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर भोसले यांनी केला.
संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय नववे अधिवेशन अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात २७ आणि २८ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत पार पडणार आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते.
सध्या देशात जातीयवाद, धर्मवाद, अत्याचार, जातीय दंगली, विचारवंताच्या हत्यांचे प्रमाण वाढले आहे. देशाची घटना जाळून मनुवादी विचारांची संस्कृती पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे; परंतु घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसारच देशाचे राज्य चालले पाहिजे. आपण सर्व एक आहोत आणि आपण सर्व भारतीय आहोत, हा प्रमुख संदेश संभाजी ब्रिगेडच्या ९ व्या अधिवेशनातून दिला जाणार असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.
भिमा-कोरेगाव दंगलीसंदर्भात भिडेंवर अजूनही कारवाई झालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. संभाजी ब्रिगेड ही सामाजिक चळवळ आहे. या चळवळीतून संभाजी ब्रिगेड नावाचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन झालेला आहे.
त्या कालावधीत संभाजी ब्रिगेडच्या चळवळीच्या कामाला गती आली नव्हती. आता मात्र भाजपाच्या विचारधारेला विरोध करणारे सर्व घटक एकवटले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारिप बहुजन महासंघ, एमआयएम यांच्या आघाडीसोबत संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष आहे. त्यांच्या आघाडीचा फायदा हा भाजपालाच होणार आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीत मदत करण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
>संभाजी ब्रिगेडचे ९ वे अधिवेशन अलिबागला
शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचे एकही अधिवेशन झाले नव्हते. ती खंत आता दूर होणार आहे. २६ आॅक्टोबर रोजी रायगडावर शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातेला अभिवादन करून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह जेथे केला, त्या पावनभूमीत त्यांना नतमस्तक झाल्यानंतर अधिवेशनाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्याप्रसंगी रॅलीमध्ये राज्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिवेशन कालावधीत खासदार संभाजीराजे छत्रपती, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, रणजीतसिंह मोहिते-पाटील, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार सुनील तटकरे, आमदार जितेंद्र आव्हाड, पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल, पी. ए. इनामदार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.