खोपोलीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; महिलेचा मृत्यू
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 5, 2020 10:06 AM2020-11-05T10:06:46+5:302020-11-05T10:16:31+5:30
या स्फोटात जसनोव्हा कंपनी शिवाय एसएस पेपर ट्यूब आणि पेन ट्यूब या कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही, तर आर्कोस औद्योगिक नगरीच्या आसपास एक किलोमीटरच्या परिसरातीतल अनेक घरांच्या खिडक्यांच्या आणि कंपन्यांच्या काचाही फुटल्या.
रायगड : खोपोली तालुक्यातील साजगाव परिसरातील एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात वैष्णवी उर्फ सपना कृष्णा निवबाने (वय-३२) या महिलेचा मृत्यू झाला. तर मृत महिलेचा पती आणि तीन मुले (11 व 1.5 वर्षांच्या 2 मुली, मुलगा 9 वर्ष) जखमी झाले आहेत. तसेच इतर 2 कामगारही या स्फोटात जखमी झाले असून जखमींना नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरकोस इंडस्ट्रियल प्रिमायसेस सहकारी संस्था, ढेकूतील प्लॉट नं.26, जेसनोवा फार्मसिटिकल अँड स्पेशॅलिटी केमिकल्समध्ये मध्यरात्री २.४० वाजण्याच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. या स्फोटात प्लॉट नं. 21, 22, 24, 25 मधील कंपन्याही प्रभावित झाल्या आहेत. हा स्फोट एवढा भीषण होता, की जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत आवाज घुमला. या हादऱ्यामुळे शेजारच्या काही कंपन्यांचे शेडही कोसळले. एवढेच नाही, तर आरकोस औद्योगिक नगरीच्या आसपास एक किलोमीटरच्या परिसरातीतल अनेक घरांच्या खिडक्यांच्या आणि कंपन्यांच्या काचाही फुटल्या.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या स्फोटामुळे लागलेली आग एवढी मोठी होती, की तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि जवळपास असलेल्या कंपन्यांतील कामगारांना सुरक्षितस्थळी हलवले. जखमींना खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.