कशेडी घाटात ब्लास्टिंग, एका तासाकरिता वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:03 AM2018-08-12T03:03:03+5:302018-08-12T03:03:15+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले असून, नव्या मार्गाच्या भरावासाठी लागणारे दगड येथील डोंगरातून कातळ फोडून काढले जात आहेत.
पोलादपूर - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले असून, नव्या मार्गाच्या भरावासाठी लागणारे दगड येथील डोंगरातून कातळ फोडून काढले जात आहेत. यासाठी गेले तीन दिवस दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान चोळई गावाच्या लगत ब्लास्टिंग करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबविण्यात येत आहे.
गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुरुवात करण्यात आली. या दुसºया टप्प्यातील कामात काही ठिकाणचे डोंगरावरील दगड भरावासाठी उपयुक्त असल्याने त्या भागात ब्लास्टिंग करण्यास सुरुवात करण्यात आली; पण त्यामुळे काही घरांना तडे गेल्याने व सातत्याने हादरे बसत असल्याने काम थांबविण्याचे निवेदन पोलादपूरच्या काही नागरिकांनी दिले होते, म्हणून या भागाची पाहणी संबंधित अधिकाºयांनी केली. त्यानंतर पावसाळ्याच्या दिवसात चौपदरीकरणाचे काम थांबविण्यात आले. मात्र, आता नव्याने घाटात ब्लास्टिंग करण्यात येत आहे, यासाठी पोलादपूर पोलीस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ब्लास्टिंग सुरू झाले आहे. या वेळी वाहतूक पोलिसांच्या मदतीने दोन्ही बाजूकडील वाहतूक थांबविण्यात येत आहे.
कशेडी घाटात महामार्ग चौपदरीकरण कामात डोंगर भागात कातळावर ब्लास्टिंग करावे लागत असल्याने प्रवासीवर्गाला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागून ब्लास्टिंग होईपर्यंत ताटकळत राहवे लागत आहे. परिणामी, प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
असे होते काम
ब्लास्टिंगसाठी पहिल्या १० मिनिटांत संपूर्ण तयारी करण्यात येते, यानंतर ब्लास्टिंग करण्यात येते.
हे काम पोलादपूर-चोळई गावाजवळ करण्यात येत असून, काही मीटरवर वाहने थांबविण्यात येत आहेत.
वाहनांची सुरक्षा तसेच उडणाºया धुळीचा त्रास होऊ नये, यासाठी तासाकरिता मार्ग बंद करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.