खारआंबोली, तेलवडे गावांलगत ब्लास्टिंग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:07 PM2020-02-24T23:07:13+5:302020-02-24T23:07:15+5:30
घरांना धोका; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बोर्ली-मांडला : मुरूड तालुक्यातील खारआंंबोली व तेलवडे गावांलगत अनधिकृतरीत्या बेकायदेशीर ब्लास्टिंगमुळे गावातील घरांना धोका निर्माण झाला आहे. हे काम तातडीने थांबविण्यात यावे, या मागणीसाठी खारआंबोली ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी रायगड, मुरूड तहसीलदार व पोलीस निरीक्षक मुरूड यांना निवेदन देण्यात आले आहे.
खारआंबोली व तेलवडे गावांलगत असणाºया जागेत अज्ञातांकडून ब्लास्टिंग केले जात आहे. ब्लास्टिंग करीत असलेल्या जागेपासून काही अंतरावर ग्रामस्थांची घरे आहेत; तसेच खारलॅण्डचे बंधारे आहेत. ब्लास्टिंगचा आवाज व जमिनीला बसणाºया हादऱ्यांमुळे घरांना तडे जाण्याची शक्यता आहे. तसेच खारलॅण्डचा बंधारा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. तसेच बंधाºयाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. या ब्लास्टिंगचे काम कोण करीत आहे? तसेच त्यास कोणाची परवानगी घेण्यात आली आहे? याची चौकशी व्हावी तसेच बेकायदेशीर काम करीत असल्यास त्याच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून खारआंबोली, तेलवडे गावांलगत ग्रामस्थांच्या सामायिक जागेत बेकायदेशीरपणे दगड-माती काढून ते खारलॅण्ड बंधाºयांच्या कामासाठी वापरले जात असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी संबंधितांवर योग्य कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.