लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : अचारसंहितेत रोख रक्कम, तसेच अवैध दारूवर प्रतिबंध घातला असून स्पष्ट निर्देश आहेत, तरी संबंधित नोडल अधिकारी यांनी मतदार संघातील संवेदनशील ठिकाणी लक्ष केंद्रित करून या बाबींना आळा घालावा. नाकाबंदी, भरारी पथक यांच्या माध्यमातून कडक कायवाही करावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षक त्रिवेदी यांनी दिल्या.
रायगड लोकसभा मतदार संघातील विविध शासकीय विभागांच्या नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, खर्च पथकप्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक रवीकिरण कोले आदी उपस्थित होते. नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दैनंदिन कार्यवाहीचा अहवाल नियमित सादर करावा, असेही यावेळी त्यांनी सूचित केले.
जिल्हाधिकारी किशन जावळे व पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यावेळी आपल्या अधिकाऱ्यांना सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे यावेळी निर्देश दिले.