वर्षभरात ५,८८० जणांचे रक्तदान

By Admin | Published: June 15, 2017 02:57 AM2017-06-15T02:57:55+5:302017-06-15T02:57:55+5:30

रायगड जिल्ह्यात गतवर्षभरात २०१६मध्ये विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून एकूण ११० रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांत एकूण ५ हजार

Blood donation of 5,880 people during the year | वर्षभरात ५,८८० जणांचे रक्तदान

वर्षभरात ५,८८० जणांचे रक्तदान

googlenewsNext

- जयंत धुळप। लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यात गतवर्षभरात २०१६मध्ये विविध संस्था व संघटनांच्या माध्यमातून एकूण ११० रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांत एकूण ५ हजार ८८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. गतवर्षी जिल्ह्यातील रक्ताची गरज ६ हजार ८५० रक्त बाटल्यांची होती. प्रत्यक्षात जिल्ह्यातून ५ हजार ८८० रक्त बाटल्या संकलित झाल्याने ९७० रक्त बाटल्या अन्यत्र रक्तपेढ्यांमधून उपलब्ध करून देऊन ही तूट भरून काढल्याचे रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चालू वर्षी जिल्ह्यात जानेवारीपासून एकूण ४५ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्या माध्यमातून २ हजार ३८९ रक्त बाटल्यांचे संकलन झाले. आतापर्यंत त्यातील २ हजार ३८९ रक्त बाटल्या गरजू रुग्णांना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी २५३ रक्त बाटल्या रक्तपेढीमध्ये शिल्लक असल्याचे डॉ. गवळी यांनी स्पष्ट केले.
बुधवारी अलिबाग शहरात याच रक्तदाता दिनानिमित्त जनसामान्य नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती करण्याकरिता रायगड जिल्हा रुग्णालय आणि शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या हस्ते या रॅलीस हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल फुटाणे, प्रशासकीय अधिकारी डॉ. निशा तेली, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने आदी मान्यवर उपस्थित होते.
आॅस्ट्रेलियातील डॉ. कार्ल लॅडस्टेनर यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी १४ जून या दिवशी मानवी रक्तगटाचा शोध लावला. मानववंशास यानिमित्ताने प्राप्त झालेल्या या वरदानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ जागतिक आरोग्य संघटनेकडून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून जगात साजरा करण्यात येतो.
माता सुरक्षा, रक्तदान श्रेष्ठ दान, डोनेट प्लेटलेटस यासारखे सूत्र स्वीकारून या दिवशी त्याची माहिती देऊन रक्तदानाकरिता आवाहन केले जाते. रक्ताची दैनंदिन गरज आणि उपलब्ध रक्त याचे व्यस्त समीकरण विचारात घेता, रक्तदाते निर्माण होणे काळाची गरज आहे. त्याकरिता नियमित कालावधीत स्वेच्छा रक्तदान करण्याची मानसिकता स्वीकारणे आवश्यक असल्याचे रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

११६ वेळा रक्तदान करणारे शरद गांगल : ‘रक्तदान’ हेच आपल्या आयुष्याचे सूत्र स्वीकारून महाड येथील ५६ वर्षांचे सामाजिक कार्यकर्ते शरद गांगल यांनी वयाच्या १८ वर्षी पहिले रक्तदान महाडमधील एका सेवाभावी संस्थेने आयोजित के लेल्यारक्तदान शिबिरात केले आणि त्यांच्या व्यक्तिगत स्वेच्छा ‘रक्तदान चळवळी’चा प्रारंभ झाला. वाढदिवस, विवाहाचा वाढदिवस, वडिलांचा व आईचा वाढदिवस अशा महत्त्वाच्या प्रसंगी रक्तदान करता करता त्यांना रक्तदानाची सवयच जडली आणि आता ते दर तीन महिन्यांतून एकदा न चुकता रक्तदान करतात. आपल्या रक्तदानाचे एक वेळापत्रकच त्यांनी तयार केले असून, त्या वेळापत्रकाप्रमाणे ते जेथे असतील तेथे न चुकता रक्तदान करतात

रक्तदानहेच श्रेष्ठदान
अलीकडेच ते १५ एप्रिल २०१७ रोजी पर्यटनाच्या निमित्ताने इंडोनेशियाची राजधानी बाली येथे होते. याच दिवशी त्यांच्या वेळापत्रकाप्रमाणे रक्तदानाचा दिवस होता. त्यांनी बालीमधील सरकारी रुग्णालय गाठून रक्तदान करून खंड पडू दिला नाही. रक्तही माणसाची नितांत गरजेची गोष्ट आहे. ज्याला रक्ताची गरज असते त्यासच खरी रक्ताची किंमत कळते.
अशा साऱ्या परिस्थितीत, ‘रक्तदान हे खरंच श्रेष्ठदान’ असून, ते स्वेच्छेने केले पाहिजे. आपल्या रक्तदानामुळे एखाद्या गरजूचे प्राण वाचले यापेक्षा मोठे पुण्यकर्म आयुष्यात दुसरे कोणतेही असू शकत नाही, अशी भावना शरद गांगल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.

Web Title: Blood donation of 5,880 people during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.